Belagavi

बेळगावच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासाठी ५५ कोटींचा निधी मंजूर

Share

बेळगावमध्ये नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतींच्या बांधकामासाठी महसूल विभागाकडून ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या एका आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी महम्मद रोशन यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी महम्मद रोशन यांनी नवीन डीसी कार्यालयाच्या इमारतीच्या आराखड्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, डीसी कार्यालयाचे तीन भाग आहेत. त्यापैकी एक इमारत १९१० मध्ये, दुसरी १९६४ मध्ये आणि तिसरी २०१० मध्ये बांधली आहे. १९१० मध्ये बांधलेल्या इमारतीची डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, १९६४ मध्ये बांधलेली इमारत ऐतिहासिक वारसा श्रेणीत येत नसल्यामुळे ती पाडली जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सब रजिस्ट्रार कार्यालयाला वगळून, ४० मीटर रुंदीच्या रस्त्यासह नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम केले जाईल. काही लोकांच्या मागणीनुसार जुनी झाडे न तोडता त्यांचे जतन नवीन इमारतीच्या आतच करण्यात येईल. नवीन इमारतीच्या चारही बाजूंना १२ मीटर आणि १० मीटर रुंदीचे रस्ते तयार केले जातील. यासाठी महसूल विभागाने ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि डीपीआर (DPR) तयार झाला आहे. येत्या एका आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू होईल. किल्ला कोटाच्या बाजूला ४ एकर जमीन आहे, त्यावर उद्यान विकसित करण्याबाबत आमदारांशी चर्चा करण्यात आल्याचेही महम्मद रोशन यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Tags: