उत्तर कर्नाटकाची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीवर बांधलेले अलमट्टी धरण पूर्ण भरले आहे. महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

या धरणाची एकूण पाणी साठवणूक क्षमता १२३ टीएमसी आहे. सध्या यात १२३ टीएमसी पाणीसाठा झाला असून, २३,००० क्युसेक पाण्याची आवक आणि २५,००० क्युसेक पाण्याची जावक नोंदवली गेली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता धरणावर गंगापूजन कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जून महिन्यात मंड्या जिल्ह्यातील केआरएस धरण भरल्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लगेचच गंगापूजन केले होते. आता अलमट्टी धरण भरल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर गंगापूजन करावे, अशी मागणी कृष्णा खोरे शेतकरी हितरक्षण समितीने केली आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त कृष्णा भाग्य जल निगमने गुरुवार रात्रीपासून तीन दिवसांसाठी अलमट्टी धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत.


Recent Comments