बेळगाव जिल्ह्यात कमी दर्जाचे बियाणे आणि खतांच्या तुटवड्याचा सामना करत असतानाच, शेतकऱ्यांनी लावलेल्या सोयाबीन पिकावर कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील पीक नष्ट झाले आहे. बैलहोंगल, सवदत्ती आणि बेळगाव तालुक्यात ही समस्या मोठ्या प्रमाणावर असून, शेतकरी यामुळे हैराण झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यात एकूण १.१० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे, पण कीटकांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. आपल्या डोळ्यांदेखत पीक नष्ट झालेले पाहून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली. खते, औषधे वापरून इतकी मेहनत करूनही पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन कृषी विभागाचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी बैलहोंगल तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी स्वतः शेतात उतरून पिकाची स्थिती तपासली. यावेळी, पिकाच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधून पीक नुकसानीची भरपाई देण्यासाठी पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.
यावर प्रतिक्रिया देताना शेतकऱ्यांनी सांगितले, “हजारो रुपये खर्च करून आम्ही पीक लावले. पण कमी दर्जाचे बियाणे आणि नंतर कीटकांच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण पीक नष्ट झाले आहे. सरकारने आम्हाला तात्काळ भरपाई द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
कृषी सहसंचालकांनी दिलेल्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे, मात्र भरपाई कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत ते आहेत. ही समस्या जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही पसरण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Recent Comments