मूडलगीतील असंगठित कामगार आणि गरीब लोकांसाठी ‘इंदिरा कॅन्टीन’ एक वरदान ठरले आहे. कमी किमतीत नाश्ता आणि जेवण उपलब्ध करून देणाऱ्या या कॅन्टीनचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार आणि बेमुलचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी केले.

गुरुवारी शहरातील सामुदायिक आरोग्य केंद्राच्या आवारात सुरू झालेल्या इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन करताना ते बोलत होते. मूडलगी तालुक्याचे केंद्र असल्यामुळे हे कॅन्टीन सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.
कॅन्टीनमध्ये ५ रुपयांत नाश्ता आणि १० रुपयांत जेवण उपलब्ध असणार आहे. यामध्ये विविध प्रकारचे नाश्ता व जेवण मिळणार असून, ते गुणवत्तापूर्ण असेल. गरीब, कामगार, विद्यार्थी आणि महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचा नगरपरिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर, त्यांनी कॅन्टीनमधील पदार्थ चाखून पाहिले आणि नागरिकांना ‘चो-चो बाथ’ वाढून कॅन्टीनचा शुभारंभ केला.
यावेळी नगरपरिषद अध्यक्षा खुर्शादा नदाफ, उपाध्यक्षा भीमव्वा पुजारी, बीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुभाष ढवळेेश्वर, नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष रवी सण्णाक्की, रामण्णा हंदिगुंद, हनमंत गुडळमणी, सदस्य जयानंद पाटील, शिवू चंडकी, ईरप्पा मुन्याळ, आदम तांबोळी, सुभाष सण्णाक्की, बसू झंडेकुराबर, हुसेनसाब शेख, काशाप्पा झंडेकुराबर, अब्दुलगफार डांगे, प्रकाश मुगळखोड, आनंद टपाल, रवी मूडलगी, विरूपाक्ष मुगळखोड, लक्कारप्पा शाबण्णवर, मुख्याधिकारी तुकाराम मादर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments