Belagavi

बेळगावच्या ग्रामीण भागातील रस्ते गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त करा

Share

गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त करा: म.ए.स.चा इशारा

गणेशोत्सवापूर्वी बेळगावच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी. अन्यथा, रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

आज बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले. यावेळी, ग्रामीण भागातील रस्ते गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली, ज्याला अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी बोलताना तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, “बाची-वेंगुर्ला रस्त्याची अवस्था खूप खराब झाली आहे आणि गेल्या वर्षभरापासून तो दुरुस्त करण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. गणेशोत्सवापूर्वी किमान खड्डे बुजवून तात्पुरती दुरुस्ती तरी करावी.” तसेच, “बेळगाव ग्रामीण मतदारसंघाला बारामती बनवण्याची भाषा करणाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे,” असेही ते म्हणाले.

यावेळी आर. एम. चौगुले म्हणाले की, “बेळगाव तालुक्यातील रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत, कंत्राटदाराला फोन करून दुरुस्ती सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.” ते म्हणाले की, “बाची-वेंगुर्ला रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधले असून, सरकारने निधीही मंजूर केला आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे रस्ते बांधावेत. अन्यथा, १० दिवसांनंतर पुन्हा आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला.

Tags: