Belagavi

धर्मस्थळाच्या बदनामी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी : बेळगावमध्ये आंदोलन

Share

“धर्मस्थळासाठी आम्ही आमचा जीवही अर्पण करण्यास तयार आहोत. धर्मस्थळ आणि धर्माधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी करत आज बेळगावात धर्मस्थळाच्या हजारो भक्तांनी भव्य आंदोलन केले.

आज बेळगावात हजारोंच्या संख्येने जमलेल्या धर्मस्थळाच्या भक्तांनी धर्मस्थळ आणि धर्माधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत भव्य निषेध रॅली काढली. या रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन सादर केले.

यावेळी मुक्ती मठाचे श्री शिवसिद्ध सोमेश्‍वर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले की, “धर्मस्थळ हे हिंदू धर्माचे पवित्र स्थान आहे. जेव्हा धर्मावर संकट येते, तेव्हा स्वामीजी आणि भक्तांनी आंदोलन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. धर्मस्थळ हे हजारो लोकांना आश्रय देणारे श्रद्धास्थान आहे. पूर्वी देवांनाही राक्षसांविरुद्ध लढावे लागले होते, आता पुन्हा एकदा धर्मस्थळाची प्रतिमा खराब करू पाहणाऱ्या राक्षसांविरुद्ध लढण्याची वेळ आली आहे.” ते म्हणाले की, “धर्मस्थळ आणि धर्माधिकाऱ्यांविरुद्ध षडयंत्र रचले जात आहे. त्या चार जणांना केवळ हद्दपारच नव्हे, तर फाशीची शिक्षा द्यायला हवी. जर कोणी धर्माला आव्हान दिले, तर त्याचे परिणाम वेगळे असतील. आम्ही हिंदू धर्मातील सर्व मठांना पाठिंबा दिला असून, धर्मासाठी प्राणत्याग करायलाही आम्ही तयार आहोत.” अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.

धर्मस्थळाची बदनामी करणे निंदनीय आहे. धर्मस्थळ हे न्यायपीठासारखे आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. तिथे एका महिलेवर अन्याय झाला असेल, तर ते चुकीचे आहे. पण तो अन्याय धर्मस्थळामुळेच झाला असे म्हणणे चुकीचे आहे. हे एका षडयंत्राचा भाग असू शकते. तपास सुरू असताना सोशल मीडियावर अशा प्रकारे बदनामी करणे योग्य नाही, असे धर्मस्थळाच्या भक्त अंजना रायकर यांनी सांगितले.

धर्मस्थळाला ८०० वर्षांचा इतिहास आहे. आता त्याची बदनामी करणे निंदनीय आहे. सरकारने न केलेली अनेक कामे धर्मस्थळाने करून अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणला आहे. आज धर्मस्थळावर आरोप केले जात आहेत, उद्या विधानसभेवर आरोप केले तर सरकार ती पाडून टाकेल का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. धर्मस्थळासाठी एक लाख महिला जीव द्यायला तयार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या वादाचा शेवट करावा, असेही त्या म्हणाल्या.

धर्मस्थळाला दररोज देशभरातून ५० हजार ते एक लाख भक्त भेट देतात आणि श्री मंजुनाथ स्वामी यांचे आशीर्वाद घेऊन प्रसाद ग्रहण करतात. धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवून त्यांची बदनामी केली जात आहे आणि या क्षेत्राची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गिरीश मट्टण्णावर, महेश शेट्टी तिम्मारेड्डी, समीर एम.डी. आणि जयंत यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी भक्त मंजुनाथ नागोजी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

एका निनावी तक्रारीवरून सरकारने सुरू केलेल्या तपासाचा अहवाल अद्याप तपास पथकाने सरकारकडे सादर केलेला नाही. मात्र, सोशल मीडियावर धर्मस्थळ आणि धर्माधिकाऱ्यांची बदनामी केली जात आहे. यामुळे समाजात दुही निर्माण होऊ शकते. त्यांच्यामागे कोण आहे, याचा सरकारने तपास करावा, अशी मागणी वकील गंगाधर सोनर यांनी केली.

Tags: