बेळगावातील पत्रकार संघातर्फे विशेष कामगिरी केलेल्या पत्रकारांच्या मुलांसाठी ‘प्रतिभा पुरस्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात, सध्याचे विद्यार्थीच नव्या भारताची निर्मिती करू शकतात, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

शहर परिसरातील एस.जी. बाळेकुंद्री महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, केएलई कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, आमदार आसिफ सेठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास जोशी यांच्यासह इतर मान्यवरांनी पत्रकारांच्या मुलांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभय पाटील म्हणाले की, “विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगले नागरिक बनून, आई-वडिलांच्या सेवेसोबतच समाजाची सेवा करावी. आपले ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत आणि चुकीच्या मार्गाला न जाता समाजविघातक कार्य करू नये. बेळगावच्या विकासात विद्यार्थ्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे,” असेही त्यांनी सांगितले.

उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ म्हणाले की, “समाज सुधारण्याचे काम करणारे पत्रकार कठीण परिस्थितीतही आपली सेवा बजावत असतात. त्यांच्या मुलांनीही आपल्या आई-वडिलांच्या कामाचे महत्त्व ओळखून, कठोर परिश्रम घेऊन आपले ध्येय गाठावे. भविष्यातील नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच नव्या भारताची निर्मिती शक्य आहे,” असे त्यांनी म्हटले.
केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनीही, पत्रकारांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “पत्रकार हे समाजाचा अविभाज्य घटक आहेत,” असेही ते म्हणाले.

तर, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी, ‘एस.एस.एल.सी.’ आणि ‘दुसरी पी.यू.सी.’ पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी आता आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहेत, असे म्हटले. “आत्म-संरक्षण आणि आत्मनिर्भर होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांनी ही क्षमता स्वतःमध्ये विकसित केली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments