Belagavi

सदाशिवनगरात महिलेची निर्घृण हत्या

Share

बेळगावातील सदाशिवनगर परिसरात एका महिलेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदाशिवनगरमधील लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मच्छे येथील मूळ रहिवासी असलेल्या, पण सध्या बेळगावातील सदाशिवनगरात वास्तव्यास असलेल्या महादेवी करेन्नवर (वय ४५) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. महादेवी गेल्या सहा-सात महिन्यांपासून आपल्या मुलासोबत भाड्याच्या घरात राहत होत्या. मात्र, त्यांचा मुलगा दोन दिवसांपूर्वी गावी गेला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरासे आणि पोलीस उपायुक्त नारायण भरमणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.  मृत महिलेच्या भावाच्या म्हणण्यानुसार, त्यांची बहीण नुकतीच गावाहून परतली होती. ती एका हॉटेलमध्ये काम करत होती आणि आपल्या मुलासोबत भाड्याच्या घरात राहत होती, कारण तिचा पती दारूच्या व्यसनात अडकलेला होता. यापूर्वी पतीसोबत तिचा पैशांवरून वाद झाला होता, त्यामुळे तिच्या हत्येमागे पतीचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

मृत महिलेच्या मुलाने घडल्या प्रकाराबद्दल माहिती देताना सांगितले की.. दीड वर्षांपूर्वी आम्ही एका व्यक्तीला काही पैसे दिले होते. गेल्या वेळी आम्ही ते पैसे परत मागितले असता आमच्यात वाद झाला होता. त्यामुळे त्या व्यक्तीवर देखील आमचा संशय आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाने येऊन तपासणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे.

Tags: