Belagavi

निशा छाब्रिया यांच्या स्मरणार्थ गरीब मुलांना मदतीचा हात

Share

दिवंगत निशा छाब्रिया यांच्या प्रेरणादायी आयुष्याचे आदर्श समोर ठेवून, त्यांच्या जयंतीनिमित्त गरीब आणि होतकरू मुलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मदतीचा हात देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. बेळगावच्या अनगोळ येथील संत मीरा शाळेत ‘बेलगाम टँजेंट’, ‘फोर्टी वनर्स क्लब ऑफ बेलगाम-१२५’, ‘बेलगाम राउंड टेबल-११९’, आणि ‘बेलगाम चॅलेंजर्स लेडीज सर्कल-२०८’ यांच्या सहकार्याने गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

चेअरपर्सन रेश्मा तलरेजा आणि अध्यक्ष मनोज तलरेजा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शालेय प्रशासनाधिकारी राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दफ्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रेरणा घाटगे, मीनल रायबाग, तेजस्विनी साहुकार, संगीता चिंडक, निकिता देसाई यांच्यासह इतरांनी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी बोलताना चेअरपर्सन रेश्मा तलरेजा म्हणाल्या की, “आज निशा छाब्रिया यांचा जन्मदिन त्यांच्या स्वप्नातील योजना पूर्ण करून साजरा केला जात आहे. निशा छाब्रिया नेहमीच गरीब आणि होतकरू मुलांना मदत करायच्या. त्यांचा हाच उपक्रम आम्ही पुढे चालवत आहोत.”

याप्रसंगी मुख्याध्यापिका सुजाता दफ्तरदार म्हणाल्या की, “त्रिपुरातील गरीब आणि होतकरू विद्यार्थी बेळगावच्या ‘आर्श केंद्रा’त राहून संत मीरा शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी हा जो उपक्रम सुरू केला आहे, तो प्रशंसनीय आहे. विद्यार्थ्यांनी या मदतीचा सदुपयोग करून उत्तम शिक्षण घ्यावे आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे.”

Tags: