ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बिडिसिसी बँकेच्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत लिंगायत विरुद्ध जारकीहोळी असा संघर्ष होणार का? किंवा रमेश कत्ती यांच्या विरोधात कोण उभे राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

अपेक्स बँकेनंतर राज्यातील सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वी बँक निवडणुकीत काँग्रेस, भाजप, जेडीएस यांसारख्या सर्वच पक्षांचे नेते एकत्र येऊन संचालकांची बिनविरोध निवड करत होते. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे रमेश कत्ती यांच्याकडून अध्यक्षपद काढून घेण्यात आले. कै. उमेश कत्ती हयात असताना, भालचंद्र जारकीहोळी, रमेश कत्ती अध्यक्ष असल्याने बँक शेकडो कोटी रुपयांच्या नफ्यात असल्याचे सांगत होते. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे. ‘शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक नफ्यात नेणारे आम्ही हवे की सहकार क्षेत्राला नुकसान पोहोचवणारे लोक हवेत?’ असा सवाल भालचंद्र जारकीहोळी यांनी ‘पीकेपीएस’च्या मतदार सभेत विचारला.
याचदरम्यान भालचंद्र जारकीहोळी आणि अण्णासाहेब जोल्ले यांनी एकत्र येत संकेश्वरमधील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना आणि हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संस्था आपल्या ताब्यात घेतल्या. यामुळे रमेश कत्ती सावध झाले आणि त्यांनी सहकार क्षेत्राला वाचवण्यासाठी ३० वर्षांपासून कट्टर वैरी असलेले माजी मंत्री ए.बी. पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. यामुळे त्यांनी हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आहे. आगामी हुक्केरी विद्युत संस्थेच्या निवडणुकीत रमेश कत्ती आणि ए.बी. पाटील यांच्या उमेदवारांविरोधात भालचंद्र जारकीहोळी आणि अण्णासाहेब जोल्ले आपले उमेदवार उभे करणार आहेत. याशिवाय, लिंगायत नेत्यांनी नुकत्याच महाराष्ट्रातील कन्हेरी मठात घेतलेल्या बैठकीमुळे भालचंद्र जारकीहोळी यांनी केलेल्या एका वक्तव्याने उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘मी केएमएफचा अध्यक्ष आहे. मी निवडणूक लढवणार नाही किंवा अध्यक्ष होणार नाही. लिंगायत नेतेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होतील,’ असे ते म्हणाले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत जारकीहोळींसोबत असल्यामुळे रमेश कत्तींच्या पराभवाचे कारण ठरलेले अण्णासाहेब जोल्ले आता जारकीहोळी यांच्या सोबत आहेत. लिंगायत नेत्यांच्या बैठकीनंतर, अण्णासाहेब जोल्ले ऐनवेळी रमेश कत्तींना साथ देतील की त्यांच्या विरोधात उभे राहतील, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
बेळगाव डीसीसी बँकेचे संचालक झाल्यावर अनेक नेते आमदार, खासदार आणि मंत्री झाले आहेत. त्यामुळेच आता प्रभावशाली नेते आपले मुलगे आणि भावांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहेत. सध्याच्या निवडणुकीत बेळगाव मतदारसंघातून विद्यमान संचालक राजेंद्र अंकलगी यांना वगळून सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुत्र राहुल जारकीहोळी यांना संधी देण्यात आली आहे. खानापूर मतदारसंघातून गेल्या वेळी निवडणूक लढवलेल्या माजी आमदार डॉ. अंजली लिंबाळकर यांचा कमी मतांनी पराभव झाला होता. यावेळी कडवी झुंज देण्यासाठी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी खानापूर तालुक्यातील पीकेपीएस सहकारी मतदारांना भेटत आहेत. माजी आमदार आणि विद्यमान संचालक अरविंद पाटील यांनी एमईएस सोडून भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. त्यांना भाजप आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचा पाठिंबा असल्यामुळे अरविंद पाटील आणि चन्नराज हट्टीहोळी यांच्यातील लढत अटीतटीची होणार आहे. बेळगावच्या डीसीसी बँक निवडणुकीबाबत लोकांमध्ये वाढलेली उत्सुकता पाहता, पीकेपीएसचे मतदार कोणाला साथ देतात आणि कोणाचा हात धरतात, हे येणारा काळच ठरवेल.


Recent Comments