Banglore

अखेर प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप

Share

हासनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच, पीडित महिलेला ११ लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यामुळे प्रज्वल रेवण्णा यांना मोठी शिक्षा झाली आहे.

केआर नगर येथील एका घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार करून तिचे अपहरण केल्याच्या प्रकरणात जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर आता बंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने शिक्षेची सुनावणी केली. लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेप आणि ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयपीसी कलम ३७६(२)(के) अंतर्गत हा निकाल देण्यात आला असून, त्यानुसार प्रज्वल यांना जन्मभर तुरुंगात राहावे लागेल.

न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी केवळ ४ महिन्यांच्या विक्रमी वेळेत हा निकाल दिला आहे. एकूण चार प्रकरणांपैकी (तीन बलात्कार आणि एक लैंगिक अत्याचार) एका प्रकरणात हा निकाल जाहीर झाला आहे. शुक्रवारी प्रज्वल यांना दोषी ठरवल्यानंतर, शिक्षेची सुनावणी शनिवारी होणार होती. आज सकाळी झालेल्या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी अंतिम निकाल जाहीर केला.

यापूर्वी, सरकारी वकील बी.एन. जगदीश आणि एस.पी.पी. अशोक नायक यांनी प्रज्वल यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर प्रज्वल यांच्या वकील नलिनी मायेगौडा यांनी युक्तिवाद करताना, शिक्षा देताना आरोपीचे राजकीय भविष्य, वय अशा गोष्टींचा विचार करावा, अशी विनंती केली होती.

यावर न्यायालयाने प्रज्वल यांचे मत विचारले. त्यावर प्रज्वल यांनी उत्तर दिले की, “मी खासदार असताना कोणीही माझ्यावर आरोप केला नव्हता. मग निवडणुकीच्या वेळीच असे आरोप का केले गेले?” असे विचारत त्यांनी “न्यायालयाचा कोणताही निर्णय मला मान्य असेल,” असे सांगितले.

Tags: