बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील ११४ गावांचा विकास करणे हेच माझे ध्येय आहे. सलग दोन वेळा आशीर्वाद देणाऱ्या मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी मी सातत्याने काम करत आहे, असे महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.

श्री मडीवाळेश्वर मठाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गावातील जुनी मागणी पूर्ण होत असल्याचा आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळत असून, पुढील श्रावणापर्यंत हा मठ पूर्ण होईल. मठाच्या बांधकामासाठी १.२५ कोटी रुपये आधीच मंजूर झाले असून, यात स्वतः २५ लाख रुपयांची भर घालून एकूण १.५० कोटी रुपये खर्चून एक सुसज्ज ज्ञानार्जन केंद्र उभे राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे केंद्र समाजासाठी महत्त्वाचे ठरेल आणि पुढील पिढीला मार्गदर्शन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आपण करत असलेली कामे सुरळीत पार पडावीत आणि विकास अविरतपणे चालू राहावा यासाठी भूमिपूजन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, त्यांच्या मदतीमुळेच कर्नाटकसारख्या मोठ्या राज्याच्या मंत्रिमंडळात एकमेव महिला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. जनतेच्या आशीर्वादामुळेच मोठ्या अपघातातूनही आपण वाचल्याचे सांगत, मतदारसंघाचा विकास करणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या. ग्रामीण भागातील मठ आणि मंदिरांच्या विकासाला प्राधान्य देऊन, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहू, असे आश्वासनही मंत्री हेब्बाळकर यांनी दिले.
कार्यक्रमाला बडस मडीवाळेश्वर मठाचे श्री प्रशांत देवरू, विजापूरचे श्री प्रभुदेवरू, सी.सी. पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष शोभा कुरबर, मनसूर अली अत्तार, सुरेश इटगी, रवी मेळेद, बसवंत नाईक, भरमण्णा शिगीहळ्ळी, फकीर शिगीहळ्ळी, सिद्दु संपगाव, इनायत अत्तार, पर्वतगौडा पाटील, गौस सिम्पी, बसवराज कलारकोप्पा, भीमशी हादिमनी, रामनगौडा मदलभावी, संतोष बंदव्वगोळ, सुनील, नागप्पा आणि भक्तगण उपस्थित होते.


Recent Comments