सर्व सेवांमध्ये देशसेवा ही सर्वश्रेष्ठ आहे. देशाच्या सीमेवर उभे राहून, पाऊस, थंडी किंवा उन्हाची पर्वा न करता शत्रूंविरुद्ध लढणाऱ्या सैनिकांच्या सेवेला मोल नाही, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेळगाव शहरातील के.पी.टी.सी.एल. सामुदायिक भवनात अखिल कर्नाटक माजी सैनिक संघ जिल्हा शाखा, बेळगाव यांच्या वतीने शनिवारी आयोजित २६ व्या कारगिल आणि ऑपरेशन सिंधूर विजयोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मंत्री हेब्बाळकर यांनी यावेळी सैनिकांमुळेच देश सुरक्षित असून, सर्वांनी एकोप्याने राहावे, असे आवाहन केले.

सैनिकांनी आपले जीवन भारताच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. देशाच्या सीमेवर उभे राहून शत्रूंच्या गोळ्यांना छाती देणाऱ्या वीर सैनिकांबद्दल कितीही बोलले तरी कमीच आहे, आपण कारगिल युद्ध जिंकले आणि अलीकडेच ‘ऑपरेशन सिंधूर’द्वारे आपली क्षमता सिद्ध केली आहे. याला भारत देशात मोठ्या संख्येने वीर सैनिक असणे हेच एक मोठे प्रमाण आहे. आपण सैनिकांबद्दल नेहमीच आदराची भावना बाळगतो. देशाच्या सीमेचे रक्षण करून आलेल्या माजी सैनिकांचा आपण नेहमीच आदर करतो. सैनिकांबद्दल मला विशेष आदर, प्रेम आणि काळजी वाटते, असेही त्यांनी नमूद केले.

मंत्री हेब्बाळकर पुढे म्हणाल्या की, सैनिक सेवेत असताना पाऊस, थंडी आणि उन्हात देशासाठी लढतात. निवृत्त झाल्यावरही ते शांत न बसता समाजातील उणिवा दूर करण्याचे काम करत आहेत. माजी सैनिकांच्या अनेक मागण्या आहेत; त्यांची शिस्तबद्ध जीवनशैली पाहता, त्यांना सरकारच्या मदतीची गरज नाही असे वाटते. माजी सैनिक हेच आपल्यासाठी आदर्श आहेत, असेही मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा, बेळवाडी मल्लम्मा यांसारख्या वीरांना या भूमीने जन्म दिला आहे. बेळगाव जिल्ह्याने देशाचे रक्षण करण्यासाठी हजारो सैनिक दिले आहेत. कर्नाटकातून सर्वाधिक सैनिक असलेला जिल्हा म्हणजे आपला बेळगाव. याचा मला खूप अभिमान आहे, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला श्री रुद्रय्या हिरेमठ स्वामी, आमदार आसिफ सेठ, बसप्पा तळवार, युवराज कदम, मनोहर बेळगावकर, शंकरगौडा पाटील, सुनील दागर, कल्लप्पा पाटील, आर.वाय. हिरेमठ, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.


Recent Comments