बेळगावातील गुरुवार पेठ, टिळकवाडी येथील रहिवासी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड कला नागेश सातेरी (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.

माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मुलगा ॲड. अजय सातेरी, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. जायंट्स आय फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले.
कॉ. कला सातेरी यांनी भारतीय महिला फेडरेशनच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या माजी अध्यक्षा, राज्य शाखेच्या अध्यक्षा, व राष्ट्रीय मंडळाच्या सदस्या म्हणून कार्य केले होते. त्या अन्नपूर्णा महिला मंडळ बेळगावच्या अध्यक्षा तसेच बेळगावातील विविध संघ-संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या इच्छेनुसार, जायंट्स आय फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष मदन बामणे यांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाला त्यांचे देहदान करण्यात आले. तसेच, बिम्सच्या नेत्र विभागाला नेत्रदान आणि केएलई रोटरीच्या त्वचा बँकेला त्वचा दान करण्यात आली.
यावेळी झालेल्या छोटेखानी शोकसभेत कॉ. आनंद मेणसे आणि ज्येष्ठ नेते किरण ठाकूर यांनी कला सातेरी यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. मृत्यूनंतरही देहदान करून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपल्याचे सांगत त्यांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी समाजातील विविध संस्थांचे मान्यवर, वकील, आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.


Recent Comments