Belagavi

शाळेला दांडी… थेट जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी!

Share

बेळगाव तालुक्यातील कोंडूसकोप्प गावातील अनेक शेतकऱ्यांनी उत्तर कर्नाटकातील सुवर्णसौध आणि राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी आपल्या शेतजमिनी दिल्या आहेत; मात्र, त्यांच्याच मुलांना बसची सुविधा मिळत नसल्याने रोज त्रास सहन करावा लागत आहे. आज सकाळी विद्यार्थ्यांनी गावात महामार्ग रोखून आंदोलन केले. त्यानंतर शाळेत न जाता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन “आम्हाला बस हवीच!” अशा घोषणा देत तीव्र निदर्शने केली.

कोंडूसकोप्प गावातील शेतकऱ्यांनी सुवर्णसौध आणि राष्ट्रीय महामार्ग उभारणीसाठी आपल्या जमिनी दिल्या. परंतु, या गावातील विद्यार्थ्यांना बसची सोय नसल्याने शैक्षणिक नुकसान सोसावे लागत आहे. आज कोंडूसाकोप्पाजवळ महामार्ग रोखून विद्यार्थ्यांनी बससाठी आंदोलन केले. परिणामी, तासाभरासाठी वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच हिरेबागवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आणि मुलांना बसमध्ये बसवून शाळेत पाठवले.

मात्र, बसने शाळेत न जाता विद्यार्थी थेट बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी बसच्या कमतरतेविरुद्ध आणि शैक्षणिक नुकसानीविरोधात घोषणा देत आपला तीव्र असंतोष व्यक्त केला. शालेय विद्यार्थ्यांनी स्वतः निवेदन लिहून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

यावेळी कोंडूसकोप्प येथील एका विद्यार्थिनीने सांगितले की, आमच्या गावात फक्त एकच बस आहे. सकाळी ८ वाजताची बस असूनही ती नसल्यासारखीच आहे. इतके दिवस आम्ही इतर बसने शाळेत जात होतो. पण आता इतर बसमधील विद्यार्थीनींना शिवीगाळ करत आहेत आणि विद्यार्थ्यांना मारहाणही करत आहेत. यामुळे परीक्षा असूनही आम्हाला शाळेत जाता येत नाही आणि शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. अनेक वेळा गावातील प्रमुख व्यक्तींनी सांगितले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही अशी प्रतिक्रिया या विद्यार्थ्याने व्यक्त केली.

कोंडूसकोप्प गावातून बस एक-दोन किलोमीटर बाहेर उतरवून जाते. पाऊस असो की ऊन, विद्यार्थ्यांना चालत जावे लागते. बसमध्ये प्रचंड गर्दी असते. यामुळे आपल्या गावासाठी बससुविधा पुरविण्यात यावी, अशी मागणी उपस्थित विद्यार्थ्यांनी केली.

यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: