Belagavi

बेळगावात मुसळधार पावसामुळे घर कोसळले

Share

बेळगावात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काकतीवेस येथे एक घर कोसळले आहे. घराचे सदस्य गोकाक यात्रेला गेल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

बेळगावातील काकतीवेस भागातील हरळय्या समाज वसाहतीत, गेल्या संध्याकाळी सततच्या पावसामुळे एक घर कोसळले. यामुळे घरातील सर्व वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील सर्वजण गोकाक येथील श्री लक्ष्मी यात्रेला गेल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेसंदर्भात बोलताना या घरातील प्रतिभा कांबळे यांनी सांगितले की, आम्ही गेल्या तीन दिवसांपासून गोकाक यात्रेला गेलो होतो. दरम्यान, शेजाऱ्यांनी फोन करून घर कोसळल्याची माहिती दिली, तेव्हा आम्ही बेळगावात परतलो. घरातील धान्य आणि स्वयंपाकघरातील वस्त्यांचे नुकसान झाले आहे. आता आम्हाला दुसरीकडे राहावे लागणार आहे.

नगरसेवक मुझम्मिल डोणी यांनी सांगितले की, काल संध्याकाळी काकतीवेस येथील परशुराम ईश्वर कांबळे यांचे घर कोसळले. घरात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली, पण घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. सरकारकडून २ लाख ४० हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही आणि आमदारांच्या सहकार्याने प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी महसूल निरीक्षक शिंदे, ग्रामलेखाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Tags: