राज्यातील काँग्रेस सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून, सरकारमध्ये कोणतेही काम होत नाहीये, असे माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर यांनी म्हटले आहे.

सोमवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “राज्य सरकार दिवाळखोर झाले आहे. आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. सत्ताधारी पक्षाचेच आमदार कामे होत नाहीत असे सांगत आहेत.” मुख्यमंत्री सिद्धरामय्या फक्त तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. निविदा काढल्या जात असल्या तरी, कामाचे आदेश दिले जात नाहीत. काँग्रेस आमदार राजू कागे आणि बी.आर. पाटील यांचे विधान बरोबर आहे. सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
काँग्रेसचे नाराज आमदार भाजपमध्ये येणार का, या प्रश्नावर उत्तर देताना शेट्टर म्हणाले की, राजू कागे यांच्यासह काँग्रेसमधील अनेक जण भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. त्यांच्या पक्षातील अंतर्गत वाद कधी स्फोटक ठरेल, हे सांगता येत नाही. मुख्यमंत्री बदलतील की सरकार कोसळेल हे माहीत नाही, पण ते स्वतःहून येतील. आम्ही त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत नाही. ते स्वतःहून येतात, यालाच ‘ऑपरेशन लोटस’ म्हणतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments