बेळगाव ग्रामीण भागाचे चित्र आगामी काळात बदलले पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन उच्च पदांवर पोहोचावे. ग्रामीण भागातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

बेळगावमध्ये एस.एस.एल.सी. आणि द्वितीय पीयूसी (१२ वी) परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने सन्मान आणि प्रतिभा पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, विकासालाच मूळमंत्र मानून राजकारण केले जात आहे. शिक्षण आणि आरोग्याला पहिली प्राथमिकता दिली आहे. मुले ही पालकांची संपत्ती आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांनी चांगले शिक्षण घेऊन उच्च पदांवर पोहोचावे, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून योग्य मार्ग दाखवणाऱ्या आई-वडिलांनाच आपली खरी संपत्ती मानले पाहिजे. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी असणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वच राजकारणी वाईट नसतात. त्यांनाही मन आणि हृदय असते. ते नेहमीच क्षेत्राच्या विकासाचा विचार करत असतात. बेळगाव ग्रामीण विभाग अत्यंत मागासलेला असून, सर्वांच्या आशीर्वादाने प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. प्रत्येक प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत येत्या काळात स्मार्ट क्लासरूम्स तयार केले जातील. ‘विद्येमुळे विनय येतो’ या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून अभ्यास केला पाहिजे. शिस्तबद्ध जीवन जगून आयुष्यात पुढे गेले पाहिजे. बेळगाव ग्रामीण भागातील लोकांनी आता उच्च पदांवर यावे. यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत.
यावेळी त्यांनी द्वितीय पीयूसीमध्ये ९९ टक्के गुण मिळवलेल्या मोदगा गावातील सृष्टी नारायण आपटे या विद्यार्थिनीला एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेण्यासाठी आणि बेळगाव ग्रामीणचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी रोख बक्षीस यंदापासून देण्याची घोषणाही त्यांनी केली.
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले की, सध्याच्या काळात शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. देशाच्या प्रगतीत शिक्षणाची प्रमुख भूमिका असते. मागासलेल्या बेळगाव ग्रामीण भागात २०१८ पासून ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर शिक्षण आणि आरोग्यावर भर देत आहेत. पुढील वर्षाच्या आत इंदिरा गांधी निवासी शाळा २२ कोटी रुपये खर्चून तुरमुरी येथे बांधली जाईल. हिरेबागेवाडी येथेही ३० कोटी रुपये खर्चून मोरारजी देसाई निवासी शाळेची स्वतःची इमारत बांधली जात आहे. त्याचप्रमाणे, बेळगुंदी येथे २० कोटी रुपये खर्चून तालुका स्तरावर क्रीडांगण उभारले जात आहे.
डी.डी.पी.आय. लीलावती हिरेमठ म्हणाल्या की, दूरदृष्टी आणि अर्थपूर्ण उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी जिल्ह्याने दर्जेदार शिक्षण देऊन चांगले निकाल मिळवले आहेत. शिक्षकांनी प्रामाणिकपणे शिक्षण द्यावे, अशी मंत्र्यांनी केलेली सूचना पाळून ग्रामीण भागात पुढील वेळी आणखी शैक्षणिक प्रगती साधली जाईल. मंत्र्यांनी आधीच १० कोटींहून अधिक खर्च करून शाळा विकास कार्ये सुरू केली आहेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचा विकास केला जात आहे. बेळगाव ग्रामीण भागातील लोक भाग्यवान आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्र्यांनी बेळगावमधील एस.एस.एल.सी. आणि द्वितीय पीयूसीमध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. विशेष म्हणजे, याला प्रतिसाद म्हणून विद्यार्थ्यांनीही मंत्र्यांचे आभार मानत प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
त्यानंतर, मंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून संवाद साधला, हे या कार्यक्रमाचेव विशेष आकर्षण ठरले.
यावेळी पदवीपूर्व शिक्षण विभागाचे संचालक कांबळे, युवराज कदम, सुरेश इटगी, नागेश देसाई, एस.डी.एम.सी. सदस्य, पालक, सी.पी.आय. अवटी, मनोहर बेळगावकर, गौस जालिकोप्पा, महेश कोळकार, मन्सूर अली अत्तार, गायत्री पाटील, एम.वाय. पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments