Belagavi

कडोली ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमी बळकावण्याचा प्रयत्न; देवगिरी ग्रामस्थांचे आंदोलन

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली ग्रामपंचायत हद्दीतील देवगिरी गावात लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत देवगिरी ग्रामस्थांनी शुक्रवारी स्मशानभूमीच्या ठिकाणीच आंदोलन केले. यावेळी देवगिरी ग्रामस्थांनी सांगितले की, देवगिरी गावातील सर्वे क्रमांक १२३/८ मधील १ एकर १६ गुंठे जमीन लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी म्हणून आरक्षित होती. गेल्या अनेक वर्षांपासून देवगिरी गावचे लोक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी या जागेचा वापर करत आहेत. या वर्षीही येथे अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र, आता एका व्यक्तीने ही जागा आपली असल्याचा दावा करत, अडथळे निर्माण करून स्मशानभूमी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

ग्रामस्थांनी पुढे सांगितले की, “ही जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित आहे, हे आमच्या पूर्वजांनी अनेक वर्षांपूर्वीच निश्चित केले होते. परंतु, आता एक व्यक्ती ही जागा माझी वडिलोपार्जित मालमत्ता असल्याचा आरोप करत लिंगायत समाजाची स्मशानभूमी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. हे योग्य नाही. या व्यक्तीने आपला आरोप मागे घेऊन लिंगायत समाजाला ही स्मशानभूमी पूर्वीप्रमाणेच वापरण्याची सोय उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे खासगी सहायक मलगाऊडा पाटील यांच्याकडे देवगिरी ग्रामस्थांनी आपले दुःख मांडले. देवगिरी हद्दीतील कडोली ग्रामपंचायतीच्या रि.स.नं- १२३/८ मधील ही संबंधित जमीन गेली तीन-चार पिढ्यांपासून आम्ही स्मशानभूमी म्हणून वापरत आहोत. यामुळे भविष्यातही आम्हाला ही जागा वापरण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती त्यांनी केली. ग्रामस्थांची समस्या ऐकून घेतल्यानंतर मंत्र्यांचे खासगी सहायक मलगाऊडा पाटील यांनी ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात गौडप्पा शिवनगौडा पाटील, बाबूराव पाटील, बाबू पाटील, निंगप्पा पाटील, पक्किरप्पा सदावर, तिप्पण्णा पक्किरनायक, बाबू बडिगेर, मंजुळा अंकी, रेखा सुतार यांच्यासह देवगिरी गावातील अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Tags: