शहापूर येथील बसवण्णा गल्लीतील प्राचीन श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात १०३ वर्षांनंतर पहिल्यांदाच भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी देवीची ११३ वी जयंती आणि जत्रा महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. पहाटे देवीची विशेष पूजा करून आकर्षक सजावट करण्यात आली होती. या यात्रेच्या निमित्ताने अभिषेक, ओटी भरणे, कलश मिरवणूक, पालखी सोहळा यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती देताना सुतार कुटुंबातील पुजारी वैशाली पुंडलिक सुतार यांनी सांगितले की, श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे एक जागृत स्थान आहे. ११३ वर्षांपासून येथे कोणताही जत्रा महोत्सव साजरा झाला नव्हता. आता पुजारी कुटुंबातील सर्वांनी मिळून देवीची ११३ वी जयंती आणि जत्रा महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही यापुढे दरवर्षी भक्तांच्या सहकार्याने हा जन्मोत्सव कार्यक्रम साजरा करणार आहोत. येत्या काळात हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा आमचा मानस आहे. आज पहाटे नाथ पै सर्कल, लक्ष्मी रोडवरील देवीच्या मूळ स्थानी जाऊन देवीच्या पादुकांवर अभिषेक करुन कलश मिरवणूक आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गणेशपूर आणि बसवण्णा गल्लीतील सर्व मंदिरांमध्ये पूजा करण्यात आली. तिथून पालखी मंदिरात येऊन पोहोचली. या महोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमात शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.


Recent Comments