दत्तक मुलाप्रमाणे वागणाऱ्या बहिणीच्या मुलानेच घरात चोरी करून ती दरोडा असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण बेळगावच्या मूडलगी पोलिसांनी उघडकीस आणले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून सुमारे १९ लाख रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे.

७ जून रोजी पहाटे मूडलगी तालुक्यातील कौजलगी गावात अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून, घरातील सदस्य झोपलेले असताना त्यांच्यावर तिखट फेकले आणि घरातील १९ लाख रुपये किमतीचे १९१ ग्रॅम सोने घेऊन पळ काढल्याची तक्रार पार्वतेव्वा हळ्ळूर यांनी दाखल केली होती. चोरटे आले तेव्हा पार्वतेव्वा आणि त्यांचा दत्तक मुलाप्रमाणे असलेला बहिणीचा मुलगा, लोकेश, झोपले होते. दोघांवर तिखट फेकल्यानंतर ते ओरडू लागताच चोरट्यांनी ब्लेडने लोकेशवर हल्ला केल्याचे लोकेशने सांगितले होते.
मात्र, पार्वतेव्वा यांनी आपण बाहेरच्या घरात झोपलो असल्याचे वेगळेच विधान केले होते. दोघांची विधाने वेगवेगळी असल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी तपास केला असता, लोकेशने आपणच चोरी केल्याची कबुली दिली. लोकेशला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून, चोरी झालेले सोने जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.


Recent Comments