Belagavi

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी निलंबित पोलिसांच्या निर्णयाविरोधात अभाविपचे आंदोलन

Share

बेंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्या निलंबनाच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत, तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले. आज बेळगावातील आर.पी.डी. सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थिनी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी अभाविपचे राज्य कार्यकारिणी सदस्य मंजुनाथ हंचिनमनी म्हणाले की, आरसीबीचा विजयोत्सव साजरा करण्याची आवश्यकता नसतानाही, सरकारने कोणतेही सुरक्षा उपाय न करता कार्यक्रमाचे आयोजन केले. यामुळे चेंगराचेंगरी होऊन ११ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांची कुटुंबे दुःखात आहेत. मात्र, सरकारने याची जबाबदारी पोलीस विभागावर ढकलली आहे. यात पोलीस विभागाची नव्हे तर राज्य सरकारची अपयश स्पष्टपणे दिसून येत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन देऊन नुकसान भरपाई द्यावी.

यावेळी बोलताना संघटनेचे प्रथम पाटील यांनी इशारा दिला की, राज्य सरकार प्रत्येक प्रकरणात पोलिसांवर अत्याचार करत आहे. चेंगराचेंगरी प्रकरणातही पोलिसांनाच जबाबदार धरून निलंबित केले आहे. पोलीस विभागाने कार्यक्रम करू नये असे सांगितले असतानाही तो आयोजित करण्यात आला. विजयोत्सव एका कौटुंबिक कार्यक्रमासारखा साजरा करून त्यात कुटुंबीयांनाही सहभागी करून घेतले. सर्वांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. पोलिसांना पूर्वतयारी करण्याची संधी दिली नाही. फुकट प्रसिद्धीसाठी इतरांना तुडवणे योग्य नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला नाही, तर एबीव्हीपी तीव्र आंदोलन करेल.

यावेळी या आंदोलनात शेकडो एबीव्हीपी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: