स्वामी विवेकानंदांच्या दूरदृष्टीच्या विचारांचा अवलंब करून, राज्य सरकार समाजातील शेवटच्या व्यक्तीलाही मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहे. समतापूर्ण समाज निर्माण झाल्यावरच स्वामी विवेकानंदांचे स्वप्न साकार होईल, असे कायदा, संसदीय कामकाज आणि पर्यटन मंत्री एच. के. पाटील म्हणाले.

बेळगाव येथील रामकृष्ण मिशन आश्रमाचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा झाला. आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक सेवा देणाऱ्या या आश्रमाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे परमाध्यक्ष गौतमानंदजी महाराज यांनी भूषवले.

याप्रसंगी मैसूर येथील रामकृष्ण मिशन आश्रमाचे अध्यक्ष मुक्तीदानंदजी महाराज, बेळगाव रामकृष्ण मिशन आश्रमाचे स्वामी आत्मप्रपणानंद महाराज, मंत्री एच. के. पाटील, तसेच गदगचे माजी आमदार डी. आर. पाटील आणि निवृत्त आयपीएस व माजी डीजीपी व्ही. व्ही. भास्कर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
मंत्री एच.के. पाटील यांनी सांगितले की, स्वामी विवेकानंदांच्या दूरदृष्टीनुसार सरकारने गरिबी हटवण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. मात्र, आजही मनातील ‘अस्पृश्यता’ पूर्णपणे नष्ट झालेली नाही. समानता प्रस्थापित झाल्यावरच विवेकानंदांचा ‘समतापूर्ण समाज’ प्रत्यक्षात येईल, असे ते म्हणाले. रामकृष्ण मिशन आश्रमाचे कार्य विवेकानंदांच्या विचारांना पुढे घेऊन अनेकांच्या जीवनात प्रकाश आणत आहे.

तसेच आयपीएस आणि माजी डीजीपी व्ही. व्ही. भास्कर म्हणाले की, बेळगाव येथील रामकृष्ण मिशन आश्रमाने २५ वर्षांची आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक सेवा पूर्ण केली आहे. स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि संदेश उत्तर कर्नाटकात पोहोचवणारे हे केंद्र १८९२ मध्ये विवेकानंदांनी ९ दिवस वास्तव्य केल्यामुळे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र बनले आहे. विवेकानंदांनी मानवी मूल्यांचे महत्त्व जगाला सांगितले असून, त्यांचे विचार आत्मसात करून देशाला पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी रामकृष्ण मिशन आश्रमाचे पदाधिकारी आणि स्वामी विवेकानंदांचे अनुयायी उपस्थित होते.


Recent Comments