Belagavi

कमल हासन यांच्या चित्रपटांवर बंदीची मागणी : कित्तूर कर्नाटक सेनेचे निवेदन

Share

कित्तूर कर्नाटक सेनेने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक निवेदन सादर केले असून तामिळ अभिनेता कमल हासन यांनी कन्नड भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे कर्नाटक राज्यात कमल हासन यांचे चित्रपट तसेच तामिळ चित्रपट आणि वाहिन्यांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

कमल हासन यांनी एका कार्यक्रमात ‘कन्नड भाषा तामिळ भाषेतून जन्माला आली’ असे कोणतेही पुरावे नसलेले आणि वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे संपूर्ण कर्नाटक आणि कन्नड भाषिकांचा अपमान झाला आहे. अशा प्रकारच्या उद्दाम विधानामुळे कन्नड लोकांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही कधीही सहन करणार नाही. कमल हासन यांच्यासारख्या मोठ्या अभिनेत्याने असे विधान करणे त्यांना शोभणारे नाही. जर त्यांच्याकडे याबद्दल काही पुरावे असतील तर त्यांनी ते सिद्ध करावेत; परंतु ‘कन्नड भाषिकांची माफी मागणार नाही’ हे त्यांचे विधान त्यांचा हट्टीपणा आणि कन्नडविरोधी भूमिका दर्शवते.

त्यामुळे, अभिनेता कमल हासन यांनी तात्काळ कन्नड भाषिकांची माफी मागावी. अन्यथा, कर्नाटक राज्यात फक्त कमल हासन यांचे चित्रपटच नव्हे, तर तामिळ भाषेचे कोणतेही चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि कोणत्याही प्रकारच्या वाहिन्या प्रदर्शित होऊ नयेत यावर बंदी घालण्याची मागणी या निवेदनाद्वारे आम्ही करतो. असे न झाल्यास, राज्यभर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यात शंका नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे.

Tags: