कामगार हे देशाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या उन्नतीसाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत, याचा त्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी यांनी केले.

क्रेडाई महिला युनिटने आयोजित केलेल्या ‘आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी मार्गदर्शन’ शिबिरात ते बोलत होते. बेळगावच्या मंडोळी रोडवरील गॅलेक्सी हॉलमध्ये क्रेडाई महिला युनिटच्या वतीने बांधकाम मजुरांसाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवराज हुलजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला कामगार विभागाचे अधिकारी मल्लिकार्जुन जोगूर, राजेश जाधव, राजेंद्र मुतकेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात सरकारी अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यासोबतच, तज्ज्ञ डॉक्टरांकडून कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि आवश्यकतेनुसार जागेवरच उपचारही पुरवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी, लकी ड्रॉ काढून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे वितरित करण्यात आली, ज्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.
कामगार विभागाचे अधिकारी राजेश जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, अहोरात्र मेहनत करून इमारती उभारणाऱ्या कामगारांच्या विकासासाठी शासनाने बांधकाम आणि इतर निर्माण कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. बेळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच लाख नोंदणीकृत कामगार असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे. सर्व कामगारांनी आपली नोंदणी करून घ्यावी.

क्रेडाई अध्यक्ष युवराज हुलजी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कामगार मंत्री संतोष लाड हे कामगारांच्या उन्नतीसाठी नेहमीच कटिबद्ध असतात आणि कामगार कल्याण योजनांना सहकार्य करत आहेत. कामगारांच्या मुलांचे शिक्षण, विवाह आणि इतर कार्यांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. या सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिराला यशस्वी करण्यासाठी स्नेहा कदम, अश्विनी बांडगी, वर्षा टक्केकर, करुणा हिरेमठ, सविता सायनकर यांच्यासह क्रेडाई महिला युनिटच्या इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.


Recent Comments