आम.बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईनंतर भाजपने पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली आमदार शिवराम हेब्बार आणि एस.टी. सोमशेखर यांनादेखील पक्षातून बडतर्फ केले असून यानंतर आम. यत्नाळांनी पुन्हा एकदा येडियुरप्पा कुटुंबावर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस नेत्यांशी संबंध ठेवल्यामुळे दोघांनाही भाजपने बाहेरचा रस्ता दाखवला असून, इतरांनाही यातून एक इशारा दिला आहे. या घटनेनंतर आमदार यत्नाळ यांनी येडियुरप्पा कुटुंबावर आपले शाब्दिक हल्ले सुरूच ठेवले आहेत.
भाजपने शिवराम हेब्बार आणि एस.टी. सोमशेखर यांना ६ वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ करण्याच्या निर्णयानंतर यत्नाळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, त्या दोघांना वाचवण्यासाठी विजयेन्द्र आणि येडियुरप्पा यांनी खूप प्रयत्न केले. पक्षातून कोणी बाहेर पडणार असेल तर ते फक्त यत्नाळ असतील, तुम्हाला काहीही होणार नाही, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. परंतु, बाप-लेक त्यांना वाचवण्यात अपयशी ठरले.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना यत्नाळ म्हणाले, पाकिस्तानवरील युद्धामुळे ती निवडणूक पुढे ढकलली गेली असेल, लवकरच ती होऊ शकते. या वेळी, शिवराम हेब्बार आणि एस.टी. सोमशेखर यांच्यावरील कारवाई ही प्रदेशाध्यक्ष विजयेन्द्र यांच्यासाठी स्पष्ट संदेश आहे, असे म्हणत यत्नाळ यांनी विजयेन्द्र यांच्यावरही निशाणा साधला.
यत्नाळ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेन्द्र यांच्यावर ‘बोगस सर्वेक्षण’ केल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, राज्यात आता निवडणुका झाल्यास भाजपला १६० जागा मिळतील, असे विजयेन्द्रने ‘बोगस सर्वेक्षण’ केले आहे. विजयेन्द्रला गुन्हेगारी बुद्धी आहे. आता निवडणुका झाल्यास १६० जागा मिळतील असे त्याने सर्वेक्षण केले आहे.
या आरोपावर यत्नाळ थांबले नाहीत. त्यांनी खिल्ली उडवत पुढे सांगितले, मी देखील एका एजन्सीला एक कोटी रुपये देऊन, यत्नाळ नसताना भाजपला ३० जागा मिळतील असे सर्वेक्षण करेन. अशा प्रकारे पैसे दिल्यास बरेच लोक सर्वेक्षण करतात.
यत्नाळ यांनी विजयेन्द्र यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटले, आता विजयेन्द्र शून्य झाले आहेत. ‘जनाक्रोश यात्रा’ पूर्णपणे अयशस्वी झाली आहे. तसेच, पक्षात संघटना नाही असे माध्यमांमध्येही येत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकतील म्हणून हे बोगस सर्वेक्षण केले आहे. त्यांचे वडील मुख्यमंत्री असतानाही १०४ जागा मिळाल्या नाहीत, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली. एवढेच नाही तर, “मला हत्तीवर बसवून पुन्हा भाजपमध्ये घेतले जाईल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले.
एकूणच, भाजपमधून बडतर्फ झालेले असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे आदर्श आहेत, असे म्हणत यत्नाळ यांनी येडियुरप्पा कुटुंबाविरुद्ध आपले युद्ध आणि हल्ले सुरूच ठेवले आहेत. या वकतुत्वाचा आणि बंडखोरीचा राज्याच्या राजकारणावर आणि विशेषतः भाजपमध्ये काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजयपूर


Recent Comments