Belagavi

धारवाडला हिडकल धरणातून पाणी: सतीश जारकीहोळींकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

Share

बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर माहिती दिली. यावेळी त्यांनी हिडकल जलाशयातून धारवाडला पाणी घेऊन जाण्याच्या निविदा आपल्या माहितीशिवाय मंजूर झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

बेळगावातील ‘अक्का कॅफे’ला भेट देऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत त्यांनी न्याहारी करत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातून धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणी देण्याचा मुद्दा निविदा मंजूर झाल्यानंतर आपल्या निदर्शनास आला. या संदर्भात धारवाडच्या संबंधित अधिकाऱ्यांना बेळगावला बोलावून बैठक घेतली जाईल.

यावेळी मंत्री जारकीहोळी यांनी इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही भाष्य केले. राष्ट्रीय महामार्ग हिरेशागेवाडी येथील अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच, निपाणी सेवा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यात काही कोविड रुग्ण आढळले असले तरी, त्यांना उपचार देऊन घरी पाठवले असून, सध्या कोविडचा फारसा प्रभाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय घडामोडींवर विचारले असता, हुक्केरी विद्युत वितरण मंडळाचे कत्ती बंधूंच्या हातून जाऊन जोल्ले यांच्या हाती आल्याच्या प्रश्नावर त्यांनी कोणतीही गटबाजी नसल्याचे नमूद केले. डीसीसी बँक आणि शिरा शुगर्स हे विषय पूर्णपणे वेगळे असून, प्रशासकीय मंडळातील सदस्यांनीच बंडखोरी केल्याचे त्यांनी सांगितले.

महादयी प्रकल्पाला गोवा तसेच कर्नाटक राज्यातील काही पर्यावरणवाद्यांनी विरोध केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यातील सरकारी शाळांच्या इमारतींच्या विकासाचे काम सुरू असून, बेळगाव येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यासाठी सरकारने ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ आणि बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags: