Belagavi

कोरोना स्थितीवर मुख्यमंत्र्यांकडून आढावा

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज त्यांच्या ‘कावेरी’ निवासस्थानी आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत कोविड-19च्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी अधिकारी, तज्ञ आणि मंत्र्यांकडून माहिती घेऊन काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.

सध्याच्या घडीला घाबरण्याची गरज नसली तरी, भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य आणि उपकरणे सज्ज ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यात व्हेंटिलेटर, ऑक्सिज, औषधे इत्यादींचा समावेश आहे. वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि हृदय व फुफ्फुसाचे विकार असलेल्यांनी खबरदारी म्हणून मास्क घालणे हितावह असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी दर आठवड्याला किंवा आवश्यक असल्यास दर तीन दिवसांनी आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. गर्भवती महिलांसाठी विशेष काळजी: गर्भवती महिलांना आरोग्य समस्या जाणवल्यास त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवणे थांबवून, सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. शाळांसाठी सूचना: सर्दी, खोकला, ताप असलेली मुले पालकांनी शाळेत पाठवू नयेत. शाळांनीही यावर लक्ष देऊन अशी लक्षणे असलेल्या मुलांना घरी पाठवावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत तयार राहण्यासाठी जिल्ह्यांमधील जिल्हा रुग्णालयांनी पूर्णपणे सज्ज असावे, असे निर्देश त्यांनी दिले.

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या न घेता मुख्यालयी राहून काम करावे, असेही त्यांनी सूचित केले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या लसी यार ठेवण्याचे आदेशही देण्यात आले.

आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडून आणि कोविड कार्यदलाच्या प्रमुखांकडून मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती घेतली. त्यानुसार, गेल्या जानेवारीपासून कोरोनाचे काही तुरळक रुग्ण आढळत असले तरी, मे महिन्यात त्यात वाढ झाली असून, मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात ६२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मात्र, गंभीर प्रकरणांची संख्या केवळ एक आहे. सारी रुग्णांच्या प्रकरणांमध्ये तपासणी सुरू आहे. शेजारील राज्यांमध्ये, केरळमध्ये ९५, तामिळनाडूमध्ये ६६ आणि महाराष्ट्रात ५६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या सोयीसाठी कोरोना हेल्पलाइन सुरू करण्याचे निर्देश दिले.
कोणत्याही परिस्थितीत हलगर्जीपणा करू नये आणि नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्वतोपरी तयारी ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Tags: