Belagavi

पिरनवाडीत ‘अन्नभाग्य’ योजनेच्या तांदळाचा काळा बाजार, २५० हून अधिक पोती जप्त

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या महत्त्वाकांक्षी ‘अन्नभाग्य’ योजनेअंतर्गत गरिबांना मिळणारा तांदूळ काळ्या बाजारात विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याचा प्रकार बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी येथे उघडकीस आला आहे. भगवंत सुब्बाराव भोसले यांच्या मालकीच्या गोदामातून २५० हून अधिक तांदळाची पोती जप्त करण्यात आली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पिरनवाडी येथील भगवंत सुब्बाराव भोसले यांच्या गोदामात ‘अन्नभाग्य’ योजनेचा तांदूळ मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे साठवण्यात आला होता. हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमधून कमी दरात खरेदी करून, तो काळ्या बाजारात चढ्या भावाने विकण्यात येणार होता अशी माहिती समोर आली होतील.

या घटनेमुळे गरिबांसाठी असलेल्या योजनेचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वस्त धान्य दुकानांमधूनच हा तांदूळ बाहेर जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच, इतक्या मोठ्या प्रमाणावर तांदळाची साठवणूक होत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. मात्र, पोलिसांच्या येण्यापूर्वीच गोदामातील व्यक्ती फरार झाल्याचे समजते. या घटनेतील आरोपींवर गुंडा कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Tags: