Banglore

राज्यभरात गृहलक्ष्मी संघ स्थापन करणार : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येणार असून गृहिणींसाठी गृहलक्ष्मी संघ स्थापन करणार आहे. यातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

विधानसौधमध्ये गुरुवारी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी मंत्री म्हणाल्या, महिला आणि बालविकास विभागामार्फत ‘गृहलक्ष्मी’ संघ स्थापन केला जाईल. राज्यात गृहलक्ष्मी योजनेचे 1.25 कोटी लाभार्थी आहेत. गृहलक्ष्मी योजनेतून दरमहा देण्यात येणार्‍या 2000 रुपयांचा अधिक चांगला वापर करण्यासाठी गृहलक्ष्मी संघांची स्थापना केली जाईल.

मोटम्मा महिला आणि बालकल्याण मंत्री असताना त्यांनी स्त्री शक्ती संघांची स्थापना केली होती. यातून त्यांनी महिलांमध्ये क्रांतिकारी आर्थिक बदल घडवून आणले होते. त्याचप्रमाणे, गृहलक्ष्मी संघांच्या माध्यमातून आर्थिक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आता प्रत्येक गावात संघ स्थापन करण्याचे नियोजन आहे, असे हेब्बाळकर यांनी सांगितले.

राज्यातील चार किंवा पाच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर गृहलक्ष्मी संघ सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात गृहलक्ष्मी संघ स्थापन केले जाणार आहेत.

राज्यात अंगणवाड्या अस्तित्वात येऊन पन्नास वर्षे झाली आहेत. त्यामुळे, विभागाने ऑक्टोबर महिन्यात सुवर्णवर्ष साजरा करण्यात येणार आहे. म्हैसूर किंवा बंगळूर येथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केला जाईल. गृहलक्ष्मी संघांचे उद्घाटन त्याच प्रसंगी केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला मुख्य सचिव डॉ.शालिनी रजनीश, विभाग सचिव डॉ. शामला इक्बाल, कौशल्य विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीविद्या, ईसीडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलेश सासी, विभाग संचालक टी. राघवेंद्र, मंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ. टी. एच. विश्वनाथ आदी उपस्थित होते.

Tags: