
‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी लष्करी कारवाईनंतर आपल्या वीर जवानांच्या समर्थनार्थ बेळगाव शहरात आज भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या यात्रेत शेकडो देशभक्त नागरिक सहभागी झाले होते.
भारताच्या सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल आणि देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्याला पाठिंबा देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली. धर्मवीर संभाजी महाराज चौकातून या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित असलेल्या शेकडो देशप्रेमींनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी बोलताना ज्येष्ठ नागरिक दिलीप वेरणेकर यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भारतावर दहशतवादी हल्ले घडवून भारतीयांना ठार करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने योग्य धडा शिकवला आहे. आता भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व व्यवहार थांबवून त्याला धडा शिकवला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय जवानांचे शौर्य आणि क्षमता सर्वांसाठी कौतुकाचा विषय बनली आहे. देशभरातील जनता एकत्र येऊन आपले देशप्रेम व्यक्त करत आहे, असे बसवनंतप्पा पुजारी यांनी नमूद केले. ही तिरंगा यात्रा प्रत्येकामध्ये देशभक्तीची भावना रुजवेल आणि जवानांमध्ये नवा उत्साह निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या तिरंगा यात्रेत भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांच्यासह भाजप नेते एम.बी. जीरली, डॉ. रवी पाटील, मुरुघेंद्रगौडा पाटील, मुख्तार पठाण, माजी सैनिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला, युवक-युवती आणि असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments