भगवान बुद्धांच्या बुद्ध धम्माचे अनुसरण करून जीवन जगल्यास आपले जीवन निश्चितच शुद्ध होते, असे विचार प्राध्यापक के. डी. मंत्रेशी यांनी व्यक्त केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती विभाग तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सदाशिव नगर येथील बुद्ध विहारात आयोजित केलेल्या भगवान बुद्ध जयंती उत्सव कार्यक्रमात ते विशेष व्याख्यान देत होते.
यावेळी बोलताना के. डी. मंत्रेशी म्हणाले की, आपण सर्वांनी बौद्ध धर्माचे पालन करणे आवश्यक आहे. बौद्ध धर्मामुळे आपली जीवनशैली अधिक उन्नत होते. भगवान बुद्धांनी आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून सामान्य माणसांपर्यंत पोहोचून त्यांना अष्टांग मार्गांविषयी माहिती दिली आणि एक उत्तम जीवन जगण्याची दिशा दाखविली.

याप्रसंगी त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, प्रत्येकाने या पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. बुद्धांच्या शिकवणीचा सखोल अभ्यास करून त्यांच्या तत्त्वांचे पालन करणे आजच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवान बुद्धांनी जगाला प्रेमाचा संदेश दिला आहे. द्वेष हा द्वेषाने कधीही जिंकता येत नाही, तर तो केवळ प्रेमानेच जिंकता येतो, असे ते म्हणाले. तसेच, तृष्णा हे सर्व दुःखांचे मूळ कारण आहे. जगात असलेल्या दुःखांवर मात करण्यासाठी भगवान बुद्धांनी आपल्या अष्टांग मार्गांच्या माध्यमातून प्रभावी उपाय शोधून काढले, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात बोलताना के. डी. मंत्रेशी यांनी भगवान बुद्धांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग उद्धृत केला. एका व्यक्तीने बुद्धांना विचारले की, ‘तुम्ही ध्यानातून काय प्राप्त केले?’ यावर भगवान बुद्ध म्हणाले, ‘मी जे काही मिळवले त्यापेक्षा जास्त गमावले आहे. काम, क्रोध, मद आणि मत्सर यांसारख्या नकारात्मक भावनांना मी पूर्णपणे जिंकले आहे.’ ज्या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांचे परिनिर्वाण झाले, तोच दिवस शुद्ध शुक्ल बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो, असेही मंत्रेशी यांनी स्पष्ट केले.

या बुद्ध जयंती उत्सव कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, जिल्हा पंचायतचे सहायक सचिव राहुल कांबळे, प्रद्यपाक साहुकार कांबळे समाजाचे प्रमुख मल्लेश चौगुले, वाय. पी. गडिनायक, बसवराज रायव्वगोळ, यल्लप्पा कांबळे, सिद्राय मेत्री, कल्लप्पा कांबळे, सुनंदा वाघमोरे, राजेंद्र कांबळे, नामदेव बिलकर, मल्लप्पा कांबळे, मल्लेश कुरंगे, डॉ. महानिंगप्पा कोळकार, दीपक मेत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments