मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२५ च्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ४० दिवसांच्या पूर्वतयारी योग सत्राचे आयोजन केएलई विश्वविद्यालयाच्या बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आले.

यावेळी केएलई विश्वविद्यालयाचे उप-कुलपती डॉ. नितीन गंगाणे, कुलसचिव डॉ. एम. एस. गणाचारी, आयुर्वेद महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. पी. जी. जाडर, डीन डॉ. बसवराज तुबाकी, डॉ. अशोक पाटील, डॉ. संजीव टोन्नी, डॉ. संदीप सगरे, उपस्थ्यापिका डॉ. सुमा तसेच स्वस्ववृत्त विभागाचे पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचे उप-कुलपती डॉ. सी. एम. त्यागराज उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात योगाचे महत्त्व आणि योगाभ्यासातून मिळणारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य फायदे स्पष्ट केले. ते म्हणाले की, योगाभ्यास चांगल्या मनासाठी, एकाग्रतेसाठी आणि निरोगी जीवनासाठी महत्त्वाचा आहे. आधुनिक युगात हरवलेली शांतता आणि समाधान केवळ योगाभ्यासानेच मिळू शकते. प्रत्येकाने योगाभ्यास शिकून आपले जीवन सुखमय करावे, असे आवाहन त्यांनी केले.
केएलई विश्वविद्यालयाचे उप-कुलपती डॉ. नितीन गंगाणे यांनी भारतीय योगाच्या जागतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, शांत आणि निरोगी मनासाठी योगाभ्यास अत्यंत उपयुक्त आहे. जिमकडून केवळ शारीरिक भागांना मजबूती मिळते, मात्र योगामुळे संपूर्ण शरीर सदृढ होते.

या सत्रात केएलई आयुर्वेद, होमिओपॅथी, आर.टी.एल.एस. महाविद्यालय तसेच एस.बी.जी. आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि अध्यापक सहभागी झाले होते. त्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी योगप्रेमींसाठी योगासन ‘रील्स’ स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती, ज्यात विजेत्यांना गौरवण्यात आले.
योग प्रशिक्षिका श्रीमती रश्मी चव्हाण यांनी योगासनांचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. विष्णुप्रिया, डॉ. पोली, डॉ. संदीप सगरे आणि इतरांनी विशेष प्रयत्न केले.


Recent Comments