अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, बेळगाव शहरातील महत्त्वाच्या बळ्ळारी नाल्यातील गाळ काढण्याचे काम अद्यापही थंड बस्त्यात असल्याने या भागातील शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.

बळ्ळारी नाल्याच्या गाळामुळे दरवर्षी पावसाळ्यात या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या संभाव्य गंभीर संकटातून वाचवण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी आर्त विनवणी शेतकरी करत आहेत.
बेळगाव शहर आणि अनगोळ, शहापूर, वडगाव, हलगा यांसारख्या लगतच्या भागातून वाहणारा बल्लारी नाला या परिसरातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या नाल्याच्या दुरुस्ती आणि विकासासाठी गेल्या वेळी तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले होते. परंतु, निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही, हे धक्कादायक वास्तव आहे.

गेली अनेक वर्षे नाल्यातील गाळ काढला नसल्याने, पावसाळ्यात थोड्या जरी पाण्याने तो पूर्ण भरतो आणि ‘ओव्हरफ्लो’ होऊन शेजारच्या शेतजमिनी जलमय होतात. यामुळे पिके नष्ट होतात आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. शेतकरी राजू मरवे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले, “शासनाने आमच्याकडे तातडीने लक्ष द्यावे. आमदार आणि जिल्हा पालकमंत्र्यांनी या लहान शेतकऱ्यांचे जीवन वाचवावे. गेल्या वर्षीसारखी महापूर स्थिती निर्माण झाल्यास, आमच्या जगण्याचे मोठे संकट उभे राहील,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पावसाळी आपत्ती कोसळण्यापूर्वी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी जागे होऊन बळ्ळारी नाल्याचा गाळ तातडीने काढावा, अशी कळकळीची विनंती शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. अन्यथा, कोट्यवधी रुपयांच्या निधीचे काय झाले, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.


Recent Comments