Belagavi

चव्हाट गल्लीत दूषित पाणी पुरवठा; गटार मिश्रित पाण्याने नागरिक त्रस्त

Share

बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली परिसरातील रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठ्याच्या या गंभीर समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बेळगाव महानगरपालिका आणि पाणी पुरवठ्याचे काम करणाऱ्या एल अँड टी (L&T) कंपनी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली परिसरात पाण्याची समस्या ही गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. प्रशासनाने या भागात २४ तास पाणी पुरवठा करण्याची घोषणा करत त्यासाठी नवीन पाइपलाइन टाकल्या खऱ्या, मात्र अद्यापपर्यंत कधीही पूर्ण २४ तास पाणी सोडण्यात आलेले नाही. अनेक घरांमध्ये पाण्याचे मीटरही बसवण्यात आलेले नाहीत.

आता या जुन्या समस्येमध्ये आणखी एका गंभीर समस्येची भर पडली असून, नळांना थेट गटारीच्या पाण्याचे मिश्रण झालेले दूषित पाणी येत आहे. दूषित पाणी पुरवठ्याच्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः लहान मुले आणि घरातील वृद्धांना हे दूषित पाणी प्यायल्याने पोटाचे विकार आणि इतर आजार जडत असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.

दूषित पाणी पुरवठ्याच्या या गंभीर प्रकाराबाबत संबंधित पाणी पुरवठा विभाग आणि बेळगाव महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांच्याकडून कोणताही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

महानगरपालिकेने एल अँड टी कंपनीला बेळगावच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी दिली आहे, की त्या आणखी वाढवण्याची? असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून कंपनी २४ तास पाणी पुरवठा करत नसतानाही त्याचे बिल मात्र नियमितपणे आकारले जात असल्याचा आरोप रहिवासी स्वप्नील जोगाणी यांनी केला. २४ तास पाणी मिळत नसतानाही बिलांची आकारणी करणे अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

तात्काळ या दूषित पाणी पुरवठ्याची समस्या युद्धपातळीवर सोडवून चव्हाट गल्ली परिसरातील नागरिकांना शुद्ध आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी बेळगाव महानगरपालिका आणि एल अँड टी कंपनीकडे केली आहे. या समस्येकडे यापुढेही दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Tags: