बेळगावच्या यमनापूर परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या ब्राह्मणी पतंग पक्ष्याला फेसबुक फ्रेण्ड्स सर्कलच्या सदस्यांनी वेळीच मदत करत त्याला जीवदान दिलं. तत्काळ उपचार करून हा पक्षी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

इंडाल एबीसी क्वार्टर्सजवळ जखमी अवस्थेत एका ब्राह्मणी पतंग पक्ष्याला स्थानिकांनी जखमी अवस्थेत पाहिलं. इंडाल कारखान्याचे व्यवस्थापक नितीन पृथ्वीराज यांनी तत्काळ फेसबुक फ्रेण्ड्स सर्कल या स्थानिक संघटनेशी संपर्क साधला.

त्यानंतर संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखालील टीम त्वरित घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी या पक्ष्याच्या उजव्या पंखाला गंभीर इजा झाल्याचं लक्षात घेऊन प्राथमिक उपचार केले. नंतर पक्ष्याला मऊ कापडात गुंडाळून वनविभागाचे अधिकारी मोहम्मद यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलं.
वनविभागाने या पक्ष्याला योग्य वैद्यकीय उपचार आणि निगा मिळेल, पुनर्वसनही केलं जाईल, अशी माहिती दिली. या उपक्रमात फेसबुक फ्रेण्ड्स सर्कलचे सदस्य, काँटोनमेंट बोर्ड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांचाही सहभाग होता.


Recent Comments