बेळगावात श्री भगीरथ महर्षी यांच्या जयंतीनिमित्त अहिंद वकील संघटनेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने सामाजिक न्याय, शिक्षण आणि प्रयत्नशीलतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

रविवारी बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे श्री भगीरथ महर्षी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन अहिंद वकील संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी अॅडव्होकेट एन.आर. लातूर यांनी समाजातील मागासवर्गीय घटकांसाठी संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
ते म्हणाले, अहिंद वकील संघटना ही दलित आणि मागासवर्गीय समाजाचा आवाज बनून काम करत आहे. समाजातील विविध जयंत्यांचे आयोजन हे सामाजिक ऐक्य व समरसतेचा संदेश देण्यासाठी महत्त्वाचे आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या सुविधा मिळवून देण्यात संघटनेने मोलाची भूमिका बजावली आहे.

भगीरथ महार्षी हे प्रयत्नाचे प्रतीक होते. त्यांनी गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी केलेले तप आणि प्रयत्न आजही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्यातून शिकून तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगीरथ महर्षींच्या आदर्शांवर चालावे, असे आवाहन त्यांनी केले.
मानव बंधुत्व वेदिकेचे संचालक भऱमण्णा तोळी यांनी सांगितले की, भगीरथ म्हणजे जिद्द आणि निष्ठा. समाजातील अन्याय, शोषण आणि आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी भगीरथ महार्षींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. विद्यार्थ्यांनी केवळ अडचणींवर लक्ष न देता, प्रयत्नांवर विश्वास ठेवून शिक्षणाची वाटचाल चालू ठेवावी.
या कार्यक्रमात एसएसएलसी परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त आणि द्वितीय पीयूसी परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या अहिंद आणि उप्पार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला अहिंद संघटनेचे राज्याध्यक्ष विष्णू लातूर, अशोक चौहान, रेखा लक्कुंडी, मल्लिकार्जुन राजप्पानवर, राघवेंद्र खिलारी, लकेश हेग्गण्णवर, लक्कप्पा, करिनिंगप्पागोळ, प्रविण तळवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments