Belagavi

आधुनिकतेसोबत भारतीय परंपरेचं दर्शन…

Share

तारांगण, रोटरी क्लब ऑफ बेलगाम इलाइट आणि श्रीराम इनोव्हेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने खास बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. पारंपरिक भारतीय वेशभूषा परिधान करून या रॅलीत युवतींनी उत्साहात सहभाग घेतला.

लूक पारंपरिक… पण वाहन मात्र बुलेट… तोंडात शिवाजी महाराजांचा जयघोष… आणि हातात समाजजागृतीचे फलक… होय, ही आहे एक रंजक स्पर्धेची झलक. या दृश्यांनी बेळगावमध्ये आधुनिकतेसोबत पारंपरिकतेचं सुंदर दृश्य साकारलं. मराठी संस्कृती, पेशवाई, वारकरी इत्यादी पारंपरिक परिधानात महिला सहभागी झाल्या. आधुनिक काळात महिलाही गियर बाईक चालवू शकतात आणि आपली क्षमता सिद्ध करतात हे या बाईक रॅलीच्या माध्यमातून महिलांनी दाखवून दिलं. अशा उपक्रमांमुळे महिलांना आपत्कालीन परिस्थितीतही सक्षम होण्यास मदत होते, असं शाहूनगर, बेळगावच्या प्रिया बेडकेंनी सांगितलं.

हिंडलगा येथील अनुराधा मडिवाळ यांनी सांगितलं की, महिलांना सबलीकरणाचा संदेश देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, महिलांनी पारंपरिकतेने आणि जोमाने सहभाग घेतला, हे विशेष आहे.

राजश्री हावळ यांनी सर्व महिलांना आपली संस्कृती दर्शवण्याची संधी देणाऱ्या या उपक्रमाचं कौतुक केलं. अशा प्रकारच्या अधिक स्पर्धा आयोजित व्हाव्यात आणि महिलांनी दररोज आरोग्यासाठी व्यायाम करून सशक्त राहावं, असं आवाहन त्यांनी केलं.

अरुणा गोजे पाटील यांनी सांगितलं की, महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचं त्यांनी नमूद केलं.

परिक्षिका अनुपमा जोशी यांनी सर्व स्पर्धकांचे वेशभूषा कौतुकाने वर्णन केले आणि आयोजकांचे आभार मानले.

बाईक रॅली ही रामनाथ मंगल कार्यालय, आर.पी.डी., गोवावेस सर्कल मार्गे पुन्हा रामनाथ मंगल कार्यालयात पोहोचून संपन्न झाली. यावेळी विजेत्यांना विशेष बक्षिसं देण्यात आली.

Tags: