बेळगाव ग्रामीण मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू ठेवत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी एका गावातच एकापाठोपाठ एक महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन व शुभारंभ केले.

इनाम बडस या गावात सुमारे 20 लाख रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या नवीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या बांधकामासाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. समाजाच्या एकतेचे प्रतीक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होणाऱ्या या भवनात सर्व समाज घटकांसाठी उपयोगी असे कार्यक्रम आयोजित करता यावेत, अशी इच्छा हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.
यानंतर दुर्गाप्पा पाटील यांच्या घरापासून श्री कल्मेश्वर मंदिरापर्यंत जाणाऱ्या संपर्क रस्त्याच्या 30 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. गुणवत्ता राखून हे काम वेळेत पूर्ण करावे, अशी सूचना कंत्राटदारांना करण्यात आली.
त्यानंतर गावातील सरकारी मराठी शाळेत तीन नव्या खोल्यांच्या बांधकामासाठी 42.28 लाख रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्याचे भूमिपूजनही झाले. ग्रामीण भागात शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करून भरपूर निधी आणला आहे. शेकडो शाळांचे नूतनीकरण व मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत, असे मंत्री म्हणाल्या.

त्यानंतर झालेल्या भाषणात हेब्बाळकर म्हणाल्या की, धर्म धर्म म्हणून ओरडणाऱ्यांचा धर्म केवळ भाषणापुरता असतो. माझा धर्म माझ्या कामातून दिसतो. विकास ही माझी खरी पूजा आहे. सत्तेत असो वा विरोधी पक्षात, मी कधीही काम थांबवलेले नाही. तुमच्या विश्वासाने एक महिला आमदार म्हणून मला संधी मिळाली, तो विश्वास मी सार्थ ठरवत असून बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे नाव संपूर्ण राज्यात उजळलंत आहे. पक्षभेद विसरून मी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी काम करते आहे. राज्यात कुठलाही भ्रष्टाचार न करता, मध्यस्थाशिवाय 34 हजार कोटींच्या गृहलक्ष्मी योजनेतून महिलांच्या घरी थेट पैसे पोहोचत आहेत. संपूर्ण देशात सात कोटींपैकी एकमेव महिला मंत्री म्हणून या योजनेत काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात युवराज कदम, मनोहर बेळगावकर, नारायण पाटील, सागर तोराळकर, लक्ष्मण पाटील, गीतेश तानाब, शिवाजी पाटील, शिवाजी तानाब, जयप्पा पाटील, कृष्ण गडकरी, कृष्ण कांबळे, रामू पाटील, कृष्ण पाटील, भरमण्णा कांबळे, मारुती कांबळे, शालेय कर्मचारी आणि महिलांची उपस्थिती होती.


Recent Comments