आपलं मूल नापास झालं का? मग काळजी करू नका, बागलकोटच्या एका कुटुंबाकडून शिका… त्यांनी नापास झालेल्या आपल्या मुलासाठी केक कापून, प्रेमाने मिठी मारून, ‘पुन्हा प्रयत्न कर’ असं म्हणत एक सुंदर उदाहरण समाजापुढे ठेवलं आहे. होय, ही खरी बातमी आहे.. नापास झालेलं अपयश साजरं करण्याची एक वेगळीच शाळा सुरू झाली आहे!

बागलकोट जिल्ह्यातील अभिषेक यल्लप्पा चोलचगुड या विद्यार्थ्याने एसएसएलसी परीक्षेत 625 पैकी 200 गुण मिळवत केवळ 32 टक्के मिळवले. थोडक्यात सांगायचं झालं तर, ‘शैक्षणिक यश’ त्याच्या नावापुढे यंदा थांबलं नाही. बसवेश्वर इंग्रजी माध्यम शाळेचा हा विद्यार्थी सहा विषयांत नापास झाला… नापास झाल्याने दु:खी होणं स्वाभाविक होतं. पण त्याच्या कुटुंबानं मात्र ठरवलं – हे अपयश आपण अपमानास्पद नाही, प्रेरणादायी बनवायचं!

वडिलांनी केक आणला, आईने प्रेमाने मिठी मारली, भावंडांनी गोड हसू दिलं, आणि सगळ्या कुटुंबाने मिळून नापास झालेल्या अभिषेकसाठी केक कापून आनंद साजरा केला. “अभिषेक, परीक्षेची हद्द आहे पण तुझ्या आयुष्याची नाही,” असं म्हणत त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत त्याला धैर्य दिलं.
अभिषेकचं एक वेगळंच संघर्षमय बालपण आहे – अवघा पंधरा महिन्यांचा असताना त्याच्या दोन्ही पायांना भाजल्यामुळे तो स्मरणशक्तीच्या अडचणीतून जात आहे. परीक्षेतील अपयश ही त्याच्यासाठी केवळ एक पायरी आहे, असं त्याच्या पालकांचं ठाम मत आहे.
आजच्या स्पर्धात्मक आणि गुणांवरच मोजल्या जाणाऱ्या शिक्षणप्रणालीत, ‘नापास’ मुलाला मिठी मारणाऱ्या या कुटुंबाने एक नवा संस्कार समाजाला दिला आहे. “गुण महत्त्वाचे नाहीत, प्रयत्न अधिक मौल्यवान आहेत,” हा त्यांचा संदेश सध्या संपूर्ण बागलकोटात चर्चेचा विषय ठरत आहे.


Recent Comments