अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली जात असून कायद्याने बालविवाह निषिद्ध असला तरी प्रत्यक्षात हे रोखणे हे अजूनही एक मोठे आव्हानच आहे, अशी प्रतिक्रिया स्पंदना संस्थेच्या संचालिका सुशीला यांनी दिली. बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

अक्षय तृतीयेला सामूहिक विवाह मोठ्या प्रमाणावर होतात. त्यात बालविवाह टळावेत यासाठी आयोजकांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. जर बालविवाह घडले, तर त्या प्रकरणात पॉक्सो कायद्यानुसार आणि अजामीनपात्र तरतुदींनुसार कठोर कारवाई होऊ शकते. स्पंदना संस्था आणि महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमानाने, तसेच पोलीस खात्याच्या मदतीने अशा विवाहांची माहिती मिळवून आम्ही प्रतिबंधात्मक पावले उचलतो, असेही सुशीला यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, २०२३–२४ या आर्थिक वर्षात स्पंदना संस्थेने ३०० पेक्षा अधिक बालविवाह रोखले आहेत. ‘बालविवाहमुक्त भारत’ या अभियानाअंतर्गत विवाहसमयी कोणतेही बालविवाह होऊ नयेत यासाठी आधीच प्रबोधन सुरू आहे. धर्मगुरु आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन बालविवाह हा गंभीर गुन्हा असल्याचे सार्वजनिकरित्या जाहीर केले आहे.
या पत्रकार परिषदेस स्पंदना संस्थेचे समन्वयक करप्पा मादर, शिवलीला हिरेमठ, उमा चन्नी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Recent Comments