जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्त, जनावरांच्या पोटविकारांशी संबंधित आजारांची तपासणी आणि उपचार यासंदर्भातील एक दिवसीय तांत्रिक परिषद शनिवारी बेळगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालय आवारातील “रयत भवन” मध्ये पार पडली.
या कार्यक्रमाचे आयोजन कर्नाटक सरकारच्या पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग बेळगाव, तसेच कर्नाटक पशुवैद्यकीय संघ, जिल्हा शाखा बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. राजीव एन. कूळेर होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, जागतिक पशुवैद्यकीय दिन मागील 25 वर्षांपासून साजरा केला जात आहे. आपल्या पौराणिक इतिहासात सुद्धा नकुल आणि सहदेव यांनी जनावरांच्या उपचारात सहभाग घेतला होता. सम्राट अशोकाच्या काळात पशुवैद्यकीय शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. 1762 मध्ये फ्रान्समध्ये पहिल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली.

भारतात 1800 मध्ये पुण्यात लष्करी पशुवैद्यकीय शाळा सुरु करण्यात आली होती. यानंतर पंजाबमधील सिंध प्रांतात भारतातील पहिले पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. त्यामुळे पशुवैद्यक या क्षेत्राला मोठे महत्त्व आहे. आपल्या देशातील पशुवैद्यक तज्ज्ञ हे आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठेही कमी नाहीत. म्हणूनच हा दिवस त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो, असे त्यांनी नमूद केले.

यानंतर डॉ. मंजुनाथ एस. पी. यांनी तांत्रिक व्याख्यान सादर केले. या वेळी डॉ. महेश बाबू, डॉ. मल्लप्पा राहुतनवर, डॉ. विश्वनाथ बंटी, डॉ. हनुमंत सण्णक्की, डॉ. शशिधर नाडगौड, डॉ. श्रीकांत कुवळळी, तसेच डॉ. महालिंगय्या विभूती उपस्थित होते.


Recent Comments