Belagavi

संत तुकाराम महाराज वैकुंठगमनाची ३७५ वी वर्षपूर्ती; बेळगावात अखंड गाथा पारायण

Share

संत तुकाराम महाराज यांच्या सशरीर वैकुंठगमनाच्या ३७५ व्या वर्षानिमित्त बेळगावच्या अनगोळ भागात अखंड गाथा पारायण सुरू असून, हजारो भक्त वारकरी सहभागी होत आहेत.

संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमनाच्या ३७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त बेळगावातील अनगोळ येथे अखंड गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. एस. के. ई. सोसायटीच्या मैदानावर पारायण सुरु असून, श्री तुकाराम महाराजांच्या पादुका पूजन, प्रवचन, नामस्मरण, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांद्वारे गाथा पारायण सुरू आहे.

या कार्यक्रमाबाबत इन न्यूजशी बोलताना श्रीरामसेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडूस्कर म्हणाले की, संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज बेळगावात आगमन करून कीर्तनसेवा करत आहेत आणि शहरवासीयांना आशीर्वाद देत आहेत. आजच्या तरुण पिढीवर व्यसनांचे सावट असून, अनेकजण आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. समाजात व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करीत असून, भक्तिमार्गातून युवकांनी सदृढ समाज निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.

गाथा पारायणाच्या निमित्ताने दररोज अन्नदान सेवा केली जात आहे. रविवारी खास कालाकीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी अधिकाधिक भक्तांनी सहभागी होऊन भगवंताच्या कृपाशीर्वादाचे लाभार्थी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाला हजारो संख्येने विठ्ठलभक्तांनी हजेरी लावली.

Tags: