Belagavi

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत स्वाती पाटीलचे यश : बेळगावात जल्लोषात स्वागत

Share

राजस्थानमधील कोटा येथे नुकत्याच पार पडलेल्या 20 वर्षांखालील कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत बेळगावच्या स्वाती पाटीलने रौप्यपदक पटकावले. या कामगिरीनंतर तिचे बेळगाव रेल्वे स्थानकात भव्य स्वागत करण्यात आले.

स्वाती पाटील ही बेळगावातील बी.के. महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून ती मूळची कडोली येथील आहे. कनिष्ठ गटातील 57 किलो वजन गटात खेळत तिने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. ही स्पर्धा राजस्थानमधील कोटा येथे पार पडली. स्वातीला प्रशिक्षक स्मिता पाटील आणि मंजुनाथ मादर यांचे मार्गदर्शन लाभले.

स्वाती बेळगाव येथील राज्य सरकारच्या युवा सेवा व क्रीडा विभागाच्या “बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेल” अंतर्गत प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या यशस्वी कामगिरीनंतर कुटुंबीय, क्रीडा प्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी रेल्वे स्थानकावर तिचे जल्लोषात स्वागत केले.

या वेळी बोलताना स्वाती म्हणाली, दरवेळी मी राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचत होते, पण अंतिम यश मिळत नव्हतं. मात्र यावेळी प्रशिक्षकांच्या कठोर प्रशिक्षणामुळे हे यश गवसलं. कोटा येथे झालेल्या उपांत्य फेरीत मी ६-२ अशा गुणांमध्ये विजय मिळवला, तर अंतिम फेरी दोन गुणांनी जिंकली.

प्रशिक्षिका स्मिता पाटील म्हणाल्या, संपूर्ण कर्नाटकमध्ये महिला प्रशिक्षक म्हणून मी बेळगावात सुमारे २० मुलींना प्रशिक्षण देते. युवतींना सरकारी योजनेंतर्गत मोफत प्रशिक्षण दिलं जातं. आगामी कॉमनवेल्थ, आशियाई स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद आणि ऑलिंपिकमध्ये बेळगावच्या मुलींनी सहभागी व्हावं हे आमचं उद्दिष्ट आहे. पालकांनी देखील आपल्या मुलींना या क्षेत्रात प्रोत्साहन द्यावं. स्वातीच्या मेहनतीमुळेच हे यश शक्य झालं.

स्वाती पाटीलच्या यशामुळे संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: