मानवतेला हादरवणारी घटना बेळगाव न्यायालयाच्या आवारात समोर आली आहे. एका वृद्ध व्यक्तीस अपंग अवस्थेत मरणास सोडून दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, वकिलांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले.
बेळगाव जिल्हा न्यायालयाच्या वाहनतळात एका वृद्ध व्यक्तीस अत्यंत हालअपेष्टेत आढळून आले. त्या वृद्धास बोलता येत नव्हते, शरीर अर्धवट पक्षाघातग्रस्त अवस्थेत होते आणि गंभीर आजारी वाटत होते. अंगावर कपड्यांशिवाय ओळख सांगणारे कुठलेही दस्तऐवज, पैसा किंवा आधार नव्हता. वकिल रोहित कदमगवी यांनी ही अवस्था पाहताच क्षणाचाही विलंब न करता ‘यंग बेळगाव फाउंडेशन’च्या स्वयंसेवकांशी संपर्क साधला. सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर तत्काळ घटनास्थळी पोहोचले. काही वकिलांच्या सहकार्याने त्या वृद्धास तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की, संबंधित वृद्धास मेंदूचा झटका (स्ट्रोक) आला असून, तातडीने उपचार आवश्यक आहेत. विशेषतः त्याच्या जवळ काहीच नसल्याने आणि ओळखीचा मागोवा घेता न आल्याने, त्याला आपल्या कुटुंबीयांनीच टाकून दिल्याचा संशय बळावतो आहे. काही वकिलांनीही यापूर्वी त्याला दोन अनोळखी व्यक्तींंसोबत पाहिल्याचे सांगितले.
‘यंग बेळगाव फाउंडेशन’चे अॅलन विजय मोरे यांनी रुग्णालयास भेट देऊन डॉक्टरांना योग्य उपचाराची विनंती केली. यासोबतच त्यांनी संबंधित वृद्धाची योग्य देखभाल होईल याची खात्री दिली. या संपूर्ण प्रकारामुळे सामाजिक बांधिलकी, वृद्धांची काळजी आणि कुटुंबसंस्थेतील उत्तरदायित्वावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यंग बेलगाव फाउंडेशनने या मदतकार्यात सहभागी सर्व वकिलांचे आभार मानले आहेत.
ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी असून, वयोवृद्ध, विशेषतः एकटे आणि असहाय्य व्यक्तींना सामर्थ्याने साथ देणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे पुन्हा अधोरेखित करत आहे.


Recent Comments