बेळगाव शहरातील गणेशपूर परिसरात असलेल्या लक्ष्मीनगरमध्ये एका अपार्टमेंटमध्ये घडलेल्या घटनेत महिला रहिवासीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बेळगावमधील लक्ष्मीनगर भागातील एका अपार्टमेंटमध्ये अंजना अजीत दड्डीकर (वय ४९) या महिलेची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अंजना आणि त्यांचे पती अजीत दड्डीकर हे दोघं अपार्टमेंटमध्ये राहत होते. अजीत हे ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होते. काल सायंकाळी ते घरी परतल्यानंतर त्यांना पत्नी बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर अंजना यांना तातडीने बेळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.

अंजना यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील झुमके आणि हातातील सोन्याच्या अंगठ्या चोरी गेल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. त्यामुळे ही घटना लुटीच्या उद्देशानेच घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे कमर्चाऱ्यांनी दाखल होऊन तपासणी केली. याशिवाय क्राईम डीसिपी निरंजनराज अरस आणि कॅम्प पोलिस ठाण्याचे सीपीआय अल्ताफ मुल्ला यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून अद्याप चौकशी सुरु आहे. या प्रकरणी बेळगाव कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


Recent Comments