बेळगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ५५ गावे बृहनबेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) कार्यक्षेत्रात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय आजच्या बुडा सभेत घेण्यात आला. तसेच बेळगावमधील दोन तलावांचा जलसंधारणासह पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
बेळगावमध्ये आज बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव शहर विकास प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उत्तरचे आमदार आसिफ सेठ, दक्षिणचे आमदार अभय पाटील, तसेच बुडा सदस्य पुष्पा पर्वतराव, समीउल्ला माडिवाले, निलेश चंदगडकर, राघवेंद्र भोवी, हणमंत कोंगाळी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी सभेत झालेल्या चर्चेची माहिती दिली. बेळगावच्या कणबर्गी भागात अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्कीम नं. ६१ च्या लेआउट कामासाठी १३० कोटी रुपये निधी अंतर्गत ५० टक्के केंद्र आणि ५० टक्के राज्य अशा भागीदारीत काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच ३० नवीन प्रकल्प सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. बेळगावच्या मुत्यानट्टी भागातील १३ एकर जागेवरील तलावाला ५ कोटी २० लाख रुपये निधीच्या सहाय्याने आणि सह्याद्रिनगरमधील तलावाला ५ कोटी ७५ लाख रुपये निधीच्या सहाय्याने विकसित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. शहरातील रस्त्यांचा २४ कोटी रुपये खर्चाच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे. महायोजना सल्लागारांची नियुक्ती करून चर्चाही पार पडली असून, ५५ गावे बुडाच्या कार्यक्षेत्रात आणून त्यांचा विकास केला जाणार आहे, या कामांसाठी कोणताही जमीन हस्तांतरण विरोध झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या सभेत १०८.०५ कोटींचा बचतीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. बृहन्बेळगाव ही बाब अद्याप आमच्या स्तरावर आलेली नाही, यावर निर्णय मंत्रीस्तरावर घेतला जातो, असेही त्यांनी सांगितले. बुडा लेआउट मंजूर झाल्यानंतर रामतीर्थनगरचा महापालिकेच्या कार्यक्षेत्रात २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून समावेश करण्यात आला आहे. रामतीर्थनगरमधील रहिवाशांना तातडीने जमिनीचे दाखले देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या मालमत्तेसंदर्भात महापालिकेत विशेष सिंगल विंडो प्रणाली कार्यान्वित करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली.
या बैठकीस बुडा आयुक्त शकील अहमद यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments