Belagavi

राज्यात मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही – मंत्री सतीश जारकीहोळी

Share

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांविरोधात खटला चालविण्यासाठी दिलेली परवानगी कायम ठेवत न्यायालयाने मुख्यमंत्र्यांचा अर्ज जरी फेटाळला असला तरी दुसऱ्या न्यायालयात लढण्याची संधी आहे, आम्ही लढूच, राज्यात मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.

व्हॉइस : बेळगावात पत्रकार परिषद घेऊन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांचा अर्ज फेटाळण्याच्या खटल्याच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीएम सिद्धरामय्या यांच्याकडे समस्यांना तोंड देण्याची ताकद आहे. शिवाय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत १३६ आमदार आहेत यामुळे आज आम्ही घाबरत नाही आणि कायदेशीर लढाई लढण्यासाठी तयार आहोत असे जारकीहोळी म्हणाले.

मुख्यमंत्री बदलावेत असे कोणालाही वाटत नाही. मुख्यमंत्री बदलाचा अंदाजही आम्हाला आला नाही. अशा कोणत्याही चर्चेत आम्हाला रस नाही ज्यांना रस असेल तर ते पुढे येतील, मात्र राज्यात मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली

उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्रीदेखील असतील. आमच्या पक्षाचे सर्व आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत राहणार असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबाबत काहीही करता येणार नाही. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना काम करू दिले नाही. कोणत्याही राज्याला शक्तिशाली मुख्यमंत्री नसावा, मोदींच्या विरोधात बोलणारा मुख्यमंत्री नसावा, हा भाजपचा अजेंडा असल्याचा असा आरोप त्यांनी केला.

देशात असे आरोप असणारे अनेक मंत्री आहेत, त्यांच्यावरही तक्रारी आहेत. मात्र तरीही ते कार्यरत आहेत, असा टोलाही जारकीहोळी यांनी लगावला. मुडा आणि वाल्मिकी घोटाळा हि दोन्ही वेगवेगळी प्रकरणे आहेत. मुडामध्ये अधिकाराचा तर वाल्मिकी महामंडळात पैशाचा गैरव्यवहार झाल्याचे ऐकायला मिळत असल्याचे जारकीहोळी म्हणाले.

गोकाक मधील महालक्ष्मी बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी बोलताना ते म्हणाले, सहकारी बँकेवर आमचा अधिकार नाही, न्यायालयाच्या माध्यमातून ग्राहकांना आम्हाला न्याय मिळवून द्यावा लागेल, असे ते म्हणाले. यावेळी बुडा भ्रष्टाचारावरदेखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने केलेल्या कामातील अनियमिततेची अधिकारी स्तरावर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यपाल घटनाबाह्य काम करत आहेत. भाजप कर्नाटकच्या सन्मानाचा लिलाव करत आहे. सक्षम असलेल्या काँग्रेस सरकारला पाडण्याचा भाजपचा डाव असून सत्ता आणि धर्माची तहान भाजपमध्ये शिरल्याने भाजपकडून अशा गोष्टी केल्या जात असल्याची टीका सतीश जारकीहोळी यांनी केली.

यावेळी आमदार असिफ सेठ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: