भारतीय सैन्यदलातील जवान आणि कडोलीचे सुपुत्र तुकाराम शिवाजी पाटील (वय ३७) यांचे मंगळवार दि. १७ रोजी पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांचे पार्थिव आज कडोली या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


तुकाराम शिवाजी पाटील हे हवालदार नाईक पदावर कार्यरत होते. सिकंदराबाद येथील मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इंजिनिअरींग विभागात १६ वर्षे सेवा बजावली होती. सध्या जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत होते. निवृत्त होण्यासाठी काही महिने बाकी असताना तो आजारी पडले. त्यांच्यावर पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.

गुरुवारी सकाळी पार्थिव कडोली येथे आणण्यात आल्यानंतर त्यांच्या घरासमोर काही मिनिटे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर कडोली येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी अमर रहे अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या.

सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांचे खाजगी सचिव व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, माजी ग्रा.प.उपाध्यक्ष अरुण कटांबळे, माजी ग्रा.प.सदस्य उदय सिद्धन्नावर, ग्रा.पं.अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्षा दिपा मरगाळे, पीकेपीएस कडोलीचे अध्यक्ष गजानन कागणीकर, तहसीलदार बसवराज नागराज, माजी सैनिक संघ कडोली चे बाबुराव बाळेकुंद्री, बलराम कुट्रे आदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मृत जवानाच्या पार्थिवावर अंत्यक्रिया करण्यात आल्या.


Recent Comments