आपल्या मुलांचा वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून, जल्लोषात साजरा करणे हि बाब आता सर्वत्र सर्वसामान्यपणे घडत आहे. परंतु मूक जनावराचा वाढदिवस करून भूतदया दाखविणारे खूपच कमी लोक आहेत. एम .के. हुबळीतील एका कुटुंबाने वासराचा वाढदिवस साजरा केला आहे. यासंदर्भात इन न्यूज ने घेतलेला आढावा…

हल्ली वाढदिवसाचं सेलिब्रेशन हा एक मोठा इव्हेन्ट केला जातो. यामध्ये पैशांची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी तर होतेच पण अन्नाची नासाडी आणि पाश्चात्य संस्कृतीनुसार अनेक चुकीच्याही गोष्टी घडलेल्या आपल्या निदर्शनात येतात. परंतु एका मूक जनावराचे लाड करून तितक्याच उत्साहाने वाढदिवस साजरा करणारे आपण पाहिलेत का? एम. के. हुबळीतील एका कुटुंबानेअशा पद्धतीने गावातील गायीच्या वासराचा वाढदिवस साजरा केला असून त्यांचा हा निर्णय अनुकरणीय असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
गेल्या वर्षी गौरी नावाच्या गायीच्या पोटी लक्ष्मी नावाच्या वासराचा जन्म झाला, एम. के. हुबळीत राहणाऱ्या राजेंद्र वीरप्पा मुत्नाळ या कुटुंबीयाने या वासराचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या वासराचा पहिला वाढदिवस साजरा करून सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. आपल्या घरासमोर मोठा मंडप उभा करून वासराचा वाढदिवस जंगी पद्धतीने या कुटुंबाने साजरा केला. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला.
या गावात असणाऱ्या श्री कलमेश्वर देवस्थानाच्या गायीच्या पोटी या वासराचा जन्म झाला होता. या गायी-वासराच्या रूपाने दररोज आपल्या घरी साक्षात कलमेश्वर येतात अशी धारणा असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे राजेंद्र मुत्नाळ यांनी सांगितले.
मुत्नाळ कुटुंबीयांनी ज्या आनंदाने या वासराचा वाढदिवस साजरा केला हे अत्यंत अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे अशी प्रतिक्रिया मृत्युंजय कलमठ यांनी व्यक्त केली.
वासराच्या वाढदिनी जयश्री आणि राजेंद्र यांनी केलेल्या या कार्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. शिवाय गावातील युवक मंडळाच्या वतीने दाम्पत्याचा सत्कारही करण्यात आला.


Recent Comments